www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
गुजरातची टेनिसपटू अंकिता रैना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटली. पहिल्याच भेटीत तिची जी आर्थिक अडचण होती ती दूर झाल्याने अंकिता खूप खूश आहे. मोदींनी दिलेले आश्वासन पूर्ण केल्याने अंकिताचा पुढे खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना दिलेले आश्वासन पाळले आहे. त्यामुळेच भारताची युवा टेनिसपटू अंकिता रैना हिच्या परदेशातील प्रवासखर्चाबाबतच्या समस्या दूर झाल्या आहेत. अंकिता ही अहमदाबादची खेळाडू असून आर्थिक अडचणींमुळे गेल्यावर्षी तिला परदेशातील अनेक स्पर्धामध्ये भाग घेता आला नव्हता.
अंकिताने गेल्यावर्षी मोदी यांची भेट घेतली होती. त्यावेळी मोदी मुख्यमंत्री होते. यावेळी मोदी यांनी शक्तिदूत` योजनेंतर्गत आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर लगेचच त्यांनी तिला १५ लाख रुपयांची आर्थिक मदत केली.
देशातील अव्वल क्रमांकाची खेळाडू असूनही मला किती अडचणी येत आहेत पंतप्रधान मोदी यांनी ऐकून घेतले आणि मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार एक महिन्यातच मला पाच लाख रुपयांचा धनादेश मिळाला. आता माझा परदेश प्रवास खर्चाचा भारही शासनाकडून केला जाणार आहे. परदेशातील प्रवासखर्चाची जबाबदारी शासनाने स्वीकारली असल्यामुळे माझ्यावरील आर्थिक दडपण दूर झाले आहे व आता मी निश्चिंत मनाने स्पर्धेत भाग घेऊ शकणार आहे, असे अंकिताना सांगितले.
मोदी यांनी तिला दरवर्षी २५ लाख रुपयांचे आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे तिला परदेशातील अनेक महत्त्वपूर्ण स्पर्धामध्ये भाग घेता येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.