www.24taas.com, पुणे
पुण्यात यंदा भर रस्त्यांत आणि चौकाचौकांमध्ये प्रचाराचा फड रंगणार नाही. प्रचारासाठी महापालिकेनं फक्त २५५ मैदानंच निश्चित करुन दिलीयत. त्यातून महापालिका उत्पन्नही मिळवणार आहे.
आजपर्यंत पुण्यातला अलका टॉकीज चौक अनेक निवडणुकांच्या रणधुमाळीचा साक्षीदार झाला. याच चौकातून अनेक आवाज घुमले. पण यंदा अलका टॉकीज चौकात निवडणुकीच्या प्रचारासाठी बंदी घालण्यात आली आहे. वाहतुकीची कोंडी, नागरिकांची गैरसोय या सगळ्याचा विचार करता ही बंदी घालण्यात आली आहे. प्रचारसभांनी शहरातली २५५ मैदानं उपलब्ध करुन दिली आहेत आणि याच मैदानांमध्ये सभा घेणं बंधनकारक आहे.
अनेक शाळा, महाविद्यालयांनीही प्रचारसभा घ्यायला नकार दिला आहे. त्यामुळे प्रचारसभा घ्यायच्या कुठे, असा प्रश्न राजकीय पक्षांना पडला होता. ही २५५ मैदानं वगळता कुठल्याही रस्त्यावर किंवा चौकात सभा होऊ देणार नाही, यावर पोलीस ठाम आहेत.
पोलीस आणि महापालिकेच्या या निर्णयामुळे पुण्यात आता चौकाचौकात सभा होणार नाहीत. तर नदी पात्रासारख्या ठिकाणी राजकीय पक्षांना डेरा टाकावा लागणार आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांची गैरसोय टळणार आहे आणि महापालिकेला उत्पन्नही मिळणार आहे.