www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पिंपरी-चिंचवड या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विकास कामांच्या उद्घाटनाला येणार आहेत. तेही खुद्द अजित पवार यांच्या सांगण्यावरून.... पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या कोणत्याही कामाचे श्रेय केवळ राष्ट्रवादीला आणि पर्यायाने स्व:तकडे घेणा-या अजित पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच बोलावल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटतंय.
पिंपरीमधल्या विकासकामांचं श्रेय राष्ट्रवादीनं कुणालाही घेऊ दिलेलं नाही. अजित पवारांनीही एका दिवसात १४ विकास कामांचं उद्घाटन करत आपणच शहराचे शिल्पकार असल्याची पद्धतशीर आखणी केली. पण आता पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या लौकिकात भर घालणा-या सायन्स पार्कच्या उद्घाटनासाठी थेट मुख्यमंत्री आणि शरद पवार यांना बोलावण्याचे आदेश दादांनी दिलेत. तशी तयारीही पिंपरीमध्ये सुरू झाली आहे.
पिंपरी चिंचवड हे दादांच्या स्वप्नातलं शहर आहे... आणि त्याच्या विकासासाठी अजित दादांनी खूप लक्ष घातलंय. प्रसंगी स्थानिक नेत्यांना कानपिचक्या देत त्यांनी इथ काम करून घेतली आहेत. ही कामं होत असताना त्यांनी कधीही त्याच श्रेय दुस-यांना मिळणार नाही याचीही तेवढीच काळजी घेतली. पण आता थेट बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांना बोलवायचं ठरवल्यामुळ राजकीय वर्तुळात कुजबुज सुरु झाली आहे.