पुण्यात सायबर सुरक्षेची ऐशी तैशी!

आय टी कंपन्यांचीच सायबर सुरक्षा किती तकलादू असू शकते, याचं धक्कदायक उदाहरण पुण्यात समोर आलंय. एका नामांकित आय टी कंपनीमध्ये नोकरीच्या आमिषानं तरुणाची फसवणूक झाली. त्यामुळे हा प्रकार उघड झालाय. महत्वाचं म्हणजे पुणे पोलिसांच्या सायबर सेलच्या उभारणीत मदत करणा-या केपजेमिनी कंपनीच्या बाबतीत हा प्रकार घडलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 11, 2013, 08:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
आय टी कंपन्यांचीच सायबर सुरक्षा किती तकलादू असू शकते, याचं धक्कदायक उदाहरण पुण्यात समोर आलंय. एका नामांकित आय टी कंपनीमध्ये नोकरीच्या आमिषानं तरुणाची फसवणूक झाली. त्यामुळे हा प्रकार उघड झालाय. महत्वाचं म्हणजे पुणे पोलिसांच्या सायबर सेलच्या उभारणीत मदत करणा-या केपजेमिनी कंपनीच्या बाबतीत हा प्रकार घडलाय.
रविकिरण लकडे हा तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात बुलडाण्याहून पुण्यात आला. नोकरीच्या संधींची माहिती देणा-या ‘क़्विकर’ या वेबसाईटच्या माध्यमातून त्याचा संपर्क अधिराज पवार याच्याशी आला. केपजेमिनी या प्रतिष्ठित कंपनीत तळवडेमध्ये नोकरी लावून देतो, असं सांगून अधिराज पवारनं त्याच्याकडून ४५ हजार रुपये घेतले. त्याचा कंपनीच्या अधिका-यांशी टेलिफोनिक इंटरव्ह्यूसुद्धा झाला होता. तसंच त्याला नोकरीसाठीचं ऑफर लेटरही पाठवण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्ष जॉईन करण्यासाठी कंपनीत गेल्यावर त्याला धक्काच बसला.
फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर रविकिरणनं त्याला आलेली मेल, अकाऊँटमध्ये पैसे भरल्याची रिसीट, आरोपीचा फोटो आणि गाडी नंबरही पोलिसांकडे दिला. मात्र तक्रार अर्ज देऊन २ महिने उलटले तरी या प्रकरणी एफ आय आरही नोंदवला गेला नाही.
त्याहीपेक्षा धक्कदायक बाब पुढे आहे. रविकिरणचा इंटरव्हव्यू ज्या फोन नंबरवरून झाला होता तो फोन नंबरही केप जेमिनीचाच आहे आणि ऑफर लेटरही केपजेमिनीचं अधिकृत आहे. एका मल्टीनॅशनल कंपनीचं नाव आणि संपर्काचा किती सहजतेनं गैरवापर होतो, त्याचं हे धक्कादायक उदाहरण..... या प्रकरणामध्ये कंपनीची संपर्क यंत्रणाच हॅक झाली असण्याची शक्यता आहे.
पुण्यासारख्या शहरात वेगाने विकसित झालेल्या आय टी क्षेत्रात आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्हेगारीचा व्हायरस कशा पद्धतीने शिरलाय याचा हा नमुना. यात फसवणूक झालेल्या व्यक्तींबरोबरच अशा नामांकित आय टी कंपन्यांचंही नुकसान आहे. अशा कंपन्यांचीच सायबर सुरक्षा धोक्यात असेल तर पोलिसांच्या सायबर सेलची सुरक्षा आणि पर्यायाने नागरिकांच्या सायबर सुरक्षेचं काय, हा खरा प्रश्न आहे...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.