रविंद्र कांबळे, www.24taas.com, सांगली
सांगली जिल्ह्यातील तीव्र दुष्काळाचा परिणाम पशुधनावर झाला आहे. चारा छावण्यांमुळे पशुधन काही प्रमाणात तगले असले, तरी दुध संकलनात मोठी घट झाली आहे. जिल्ह्यातील दुध संकलन तीन महिन्यात एक लाख लिटरने घटले आहे. मागील एका महिन्यातच 50 हजार लिटरनं दुध संकलन कमी झालं आहे.
सांगली जिल्ह्यात सलग दोन वर्ष दुष्काळ आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यात ४८५ गावे टंचाईग्रस्त आहेत. शासनाकडून ५४ ठिकाणी चारा छावण्या सुरु करण्यात आल्यात. मात्र ही संख्या अपूरी आहे. चार छावण्यांमध्ये सुमारे साडे ४६ हजार जनावरे दाखल आहेत. प्रत्येक जनावराला दर दिवशी 15 किलो चारा दिला जातो. मात्र फक्त उसाचा चारा दिल्यामुळे एक तर जनावरांच्या तोंडात जखमा होत आहेत, शिवाय वैरण, पेंड आणि पशु खाद्य या सारखे पोष्टिक खाद्य नसल्यानं दुधावर परिणाम होत आहे. दिवसाला पंधरा लिटर दुध देणारी एक गाय आता पाच लिटर दुध देत असल्याचे शेतकरी सांगतायेत. जनावरे छावणीत बांधली आहेत, जागा बदल झाल्यामुळे सुद्धा दूध देण्यावर परिणाम होत आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये डिसेंबर 2012 मध्ये 14 लाख 24 हजार लिटर दुध संकलन झालं होतं. आता मात्र मार्च महिन्यात दुध संकलन घटून 13 लाख 25 हजारावर आलंय. त्यातही फेब्रुवारी आणि मार्च या एका महिन्यात तब्बल 50 हजार लिटरने दुधाचा तुटवडा निर्माण झालाय.
जनावरे कत्तलखान्याकडे विक्रीसाठी चालली आहेत. त्यामुळं प्रशासनाकडून गावागावात जनावरांविषयी मार्गदर्शन केले जात आहे. औषधे दिली जात आहेत. मात्र पशुधन वाचवण्यासाठी चारा छावण्यांची आणखी गरज आहे. दुध संकलन कमी झाल्यामुळं भविष्यात नवीन संकट उभं राहण्याची शक्यता आहे.