www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
काही केल्या "टोल आम्ही देणार नाही‘, या निर्धारानं आंदोलन करणारे कोल्हापूरकर आज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणारेत. कोल्हापूर शहर जिल्हा टोलविरोधी कृती समितीनं टोलविरोधात ‘आर-या-पार’ची लढाई करत आज महामोर्चाची हाक दिलीय.
या महामोर्चाची जय्यत तयारी झाली असून मोर्चाला लाखभर लोक रस्त्यावर उतरून टोलविरोधात एल्गार करणार असा दावा टोलविरोधी कृती समितीनं केलाय. या मोर्चात सर्व पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि सामान्य जनताही रस्त्यावर उतरून टोलला अखेरचा टोला देणारेत. मोर्चाची सुरुवात गांधी मैदानातून होणारेय. टोलविरोधात निघणारा हा तिसरा महामोर्चा आहे.
कोल्हापूर शहरात 220 कोटी रुपयांचा रस्ते विकास प्रकल्प "बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा‘ या तत्त्वावर राबविण्यात आला. सुरुवातीपासूनच या प्रकल्पाला लोकांचा विरोध होता. तरीही हा प्रकल्प जनतेवर लादण्यात आला. प्रकल्पाचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झाल्यानं याविरोधात सतत आंदोलनं होत गेली. दोन वेळा महामोर्चा, सहा दिवसांचं उपोषण, धरणं आंदोलन, ठिय्या आंदोलन, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना या प्रकल्पा संबंधित आणि कराराचा भंग झाल्यासंदर्भात पुरावे देणे, निवेदनं देणे अशी अनेक आंदोलनं करण्यात आली. पण तरीही सरकारनं कोल्हापूरच्या जनतेची काडीचीही किंमत ठेवली नसल्यानं या तिसऱ्या महामोर्चाचा निर्णय घेण्यात आला.
येत्या सहा महिन्यांत विधानसभेची निवडणूक आहे. आता तरी सरकारला जाग यावी, अशी कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे. त्यामुळं आज महामोर्चाचं आयोजन केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.