www.24taas.com, झी मीडिया, बारामती
गेल्या तीन वर्षांपासून सततच्या दुष्काळामुळं पिचलेल्या जनतेला यंदा पावसानं दिलासा दिला. मात्र आकाशातून पडलेलं पाणी केवळ कागदोपत्रीच साठवलं गेल्याचं चित्र अनेक भागात दिसतंय. पाझर तलाव आहेत, पण कोरडे... बारामतीजवळ असलेल्या मुर्टी गावाची ही व्यथा कमी-अधीक प्रमाणात अनेक ठिकाणी भेडसावतेय. याविरोधात एका अंध व्यक्तीनं आवाज उठवलाय.
नामदेव करांडे जन्मांध आहेत... पण डोळे असून आंधळ्या बनलेल्या सरकारचे डोळे उघडण्यासाठी त्यांना उपोषणाचं हत्यार उगारावं लागलंय. राज्याच्या राजकारणाचं केंद्र असलेल्या बारामतीजवळ मुर्टी हे करांडेंचं गाव. मात्र गेल्या तीन वर्षांपासून गावातले नळ कोरडे ठणठणीत आहेत... टँकरच्या पाण्यावर गावाला अवलंबून रहावं लागतंय... यंदा पाऊस चांगला होऊनही हे चित्र बदललेलं नाही. कगदोपत्री परिसरातले पाझर तलाव भरले असले, तरी प्रत्यक्षात या तलावांना पाझरच फुटलेला नाही... याविरोधात करांडेंनी आवाज उठवलाय...
सगळीकडं दिवाळीचा माहौल असताना मुर्टीचं ग्रामस्थ कारंडेंच्या पाठीशी उभे राहिलेत. गावातल्या २ हजार नागरिकांनी उपोषणात सहभागी होत सरकारच्या डोळ्यात अंजन घातलंय.
पाठबंधारे खात्याचा भोंगळ कारभार आणि राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा या निमित्तानं समोर आलाय. बारामतीच्या विकासाचं मॉडेल कोणत्याही शहरानं अनुकरण करावं असंच आहे. मात्र इथून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुर्टीची व्यथा राज्यकर्त्यांना समजत नाही, हेच आश्चर्य आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.