www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यातले रिक्षाचालक आता स्मार्ट बनू लागलेत. व्यवसायाची गरज म्हणून त्यांनी इंग्रजी शिकायला सुरुवात केलीय. त्यामुळे पुणेतल्या रिक्षा चालकांनी तुमचं इंग्रजीतून स्वागत केलं तर आश्चर्य वाटायला नको.
अस्खलित नसलं,तरी कामापुरतं इंग्रजी हे रिक्षाचालक बोलू लागलेत. आज पुण्यात देशविदेशातून प्रवासी येत असतात. त्यांच्याशी आत्मविश्वासाने संवाद साधण्यासाठी पुणेकर रिक्षाचालकांनी इंग्रजीचे धडे गिरवण्यास सुरुवात केलीय. सुर्यदत्ता इन्स्टीट्यूटमध्ये हे रिक्षाचालक सध्या प्रशिक्षण घेतायत. २ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून इंग्रजी बोलू लागलेली रिक्षा चालकांची ही सहावी बॅच आहे.
विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचं शुल्क न आकारता रिक्षाचालकांना हे प्रशिक्षण देण्यात येतं. हे प्रशिक्षण पूर्ण करणा-यांचा खास प्रशस्तीपत्रक देऊनही गौरव करण्यात येतो. या रिक्षाचालकांना संगणक वापराचे देखील प्रशिक्षण देण्यात येतंय. आतापर्यंत सुमारे ३०० रिक्षाचालकांनी या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेतलाय. पुणेकर रिक्षाचालकांच्या स्मार्टनेसमध्ये यामुळे भर पडेल. त्यामुळे पुणेरी भाषेतली अस्सलता आणि इंग्रजीतलं मार्दव याचं फ्युजन आता पुण्यात पाहयला मिळू शकतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.