www.24taas.com, झी मीडिया, सांगली
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची एकमेकांवरील चिखलफेक आणि मतांसाठी पैसे वाटपाचं फुटलेलं बिंग या पार्श्वभूमीवर सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेसाठी आज मतदान होतंय.
आघाडीत मांडीला मांडी लावून बसणाऱ्या दोन्ही पक्षांच्या मंत्र्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. भाजप-सेनेनं मात्र या निवडणुकीकडे म्हणावं तसं लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे मुख्य चुरस ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातच असणार, हे निश्चित आहे. आता सांगलीच्या जनतेचा कौल आज मतदान यंत्रात बंद होईल.
निवडणुकीत पैशांचा पाऊस…
राष्ट्रवादी काँग्रेसकडून या निवडणुकीत पैशांचा बाजार मांडला गेलाय. राष्ट्रवादी काँग्रेस नेता इब्राहिम चौधरीनं मतदारांना भुलवण्यासाठी पैशाचं आमिष दिलंय. मुलगा ‘झुबेर चौधरीलाच मतदान करा’ असं आवाहन करत इब्राहिम चौधरीनं पैसे वाटलेत.
झुबेर चौधरी प्रभाग क्रमांक आठ मधून निवडणूक लढवतोय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. त्यामुळं मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे वाटपाचा खेळ सुरु आहे.
दरम्यान, काँग्रेसनं याप्रकरणी आचारसंहिता भंग झाल्याचा काँग्रेसनं आरोप केलाय. शिवाय इब्राहिम चौधरीवर कारवाईची मागणी केलीय. त्यामुळं आता याप्रकरणी निवडणूक आयोग काय कारवाई करणार याकडं साऱ्यांचं लक्ष लागलंय.