www.24taas.com, मुंबई
संजय दत्तच्या माफीला भाजपानं विरोध केलाय. कलाकार हा कायद्यापेक्षा मोठा नसतो, त्यामुळे त्याला देण्यात आलेली शिक्षा योग्य आहे, असं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलंय.
संजय दत्तला सुप्रीम कोर्टानं सुनावलेल्या शिक्षाप्रकरणी त्याला माफी मिळावी अशी मागणी अनेक राजकीय नेते आणि अभिनेत्यांकडून होऊ लागलीय. मात्र, त्याच्यासाठी अशी माफीची गांधीगिरी करणं कितपत योग्य आहे? असा सवाल उपस्थित होतोय.
सुप्रीम कोर्टानं १९९३ बॉम्बस्फोटांप्रकरणी ऐतिहासिक निकाल देताना बॉलीवुडचा मुन्नाभाई संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र, कोर्टाच्या निकालाला २४ तास उलटल्यानंतर मुन्नाभाईला शिक्षेत माफी मिळावी, यासाठी राजकारणी आणि बॉलीवुडची पळापळ सुरु झाली.
प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष काटजूंनाही संजूबाबाचा पुळका आला होता. संजय दत्तला शिक्षेत माफी मिळावी, या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर काटजूंची ही मागणी खेदजनक असल्याची टीका विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली. संजय दत्तसाठी अशाप्रकारची माफीची मागणी राजकारण्यांनी करणं कितपत योग्य आहे. अशी मागणी म्हणजे बॉम्बस्फोटांतल्या पीडितांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं नाही का? असे सवालही उपस्थित होत आहेत. त्यामुळं मुन्नाभाईला सहानभुती आणि ‘माफीची झप्पी’ का मिळावी याचा राजकारणी आणि बॉलीवुडकरांनी विचार करण्याची गरज निर्माण झालीय. आता भाजपनंही आपली प्रतिक्रिया उघड केलीय. त्यांनी संजयच्या माफीला साफ नकार दिलाय.