अॅडलेड : अॅडलेडच्या स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या पहिल्यावहिल्या ऐतिहासिक डे-नाईट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात तीन विकेटने विजय मिळवला. सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने सामना खिशात घातला.
न्यूझीलंडचा दुसरा डाव २०८ धावांवर संपुष्टात आल्यानंतर ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १८७ धावांचे आव्हान होते. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान सात विकेट गमावत पूर्ण केले आणि कसोटी मालिका २-० अशी आपल्या नावे केली.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात शॉन मार्शने ४९ आणि डेविड वॉर्नरने ३५ धावांची खेळी केली. ट्रेंट बोल्टने दुसऱ्या डावात पाच विकेट घेतल्या खऱ्या मात्र तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.
हा सामना न्यूझीलंडने जिंकला असता तर २०१३नंतर गेल्या आठ कसोटींमध्ये अपराजित राहण्याची त्यांची परंपरा कायम राहिली असती. ऑस्ट्रेलियाच्या या विजयासह अॅडलेडवर नवा इतिहासही रचला गेला. गेल्या ६४ वर्षात पहिल्यांदा या स्टेडियमवर तीन दिवसांत कसोटी सामना निकाली ठरलाय. याआधी ६४ वर्षांपूर्वी वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना तीन दिवसांत संपला होता. यात वेस्ट इंडिजने सहा विकेट राखून विजय मिळवला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.