नवी दिल्ली : लोढा समितीच्या निर्बंधांचा पालन करण्यास नकार दिल्यानं आता बीसीसीआयची सर्व बँक खाती गोठवण्याचे आदेश लोढा समितीनं दिले आहेत.
बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत काही राज्यांच्या क्रिकेट बोर्डांना मोठ्या रकमा वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर आक्षेप घेऊन लोढा समितीनं हे आदेश देण्यात आल्याचं पीटीआयनं म्हटले आहे.
यासंदर्भातलं पत्र बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के आणि सीईओ राहूल जोहरी यांनाही पाठवण्यात आलंय. दरम्यान बीसीसीआयची खाती गोठवली तर सध्या सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यावर गंडातर येण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता न्यूझीलंडच्या क्रिकेट बोर्डाला द्यावं लागणारं मानधन कुठून द्यायचं असा प्रश्न बोर्डाला पडलाय. येत्या सहा तारखेला यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहेत. या सुनावणीत जर समितीच्या आदेशांना स्थगिती मिळाली नाही, तर मात्र बीसीसीआयची मोठी अडचण होणार आहे.