गुवाहाटी : गुवाहाटीमध्ये सुरु असलेल्या १२व्या दक्षिण आशियाई स्पर्धेत हॉकीच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकल्यानंतर पाकिस्तानचे हॉकी प्रशिक्षक रेहान बट यांनी भारतीय हॉकीपटू तसेच भारतीय चाहत्यांच्या खेळ भावनेचे कौतुक केले.
'इतक्या मोठ्या सामन्यात भारताला हरवल्यानंतर यावेळचा जल्लोष नियंत्रित होता. फायनलसाठी आलेल्या सर्व प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला,' असे बट म्हणाले. भुवनेश्वरमध्ये २०१४मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सेमीफायनलमध्ये भारताला हरवल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंनी विचित्र पद्धतीने जल्लोष साजरा केला होता. यामुळे दोन्ही संघादरम्यान संबंध बिघडले होते.
आपल्या संघाच्या कामगिरीबाबत खुश असल्याचे बट यांनी सांगितले. 'भारतीय हॉकीचा स्तर उंचावला आहे आणि आमच्यासाठी हा मोठा विजय आहे. दोन्ही संघात काही सीनियर खेळाडू होते. माझ्यासाठी प्रशिक्षकवजा खेळाडूची भूमिका निभावण्याचा अनुभव वेगळा होता', असेही बट पुढे म्हणाले.