नवी दिल्ली: ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान धोनीनं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मला टेस्टचा कॅप्टन करण्यात आल्यानं धक्का बसला आणि त्यावेळी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन मी अनुष्कासमोर रडलो होतो, अशी कबुली टीम इंडियाचा स्टार प्लेयर विराट कोहलीनं दिली आहे. एका मुलाखतीदरम्यान बोलताना त्यानं कॅप्टनपदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळत वर्ल्ड क्रिकेटमध्ये दबदबा राहिला असा संघ तयार करायचा आहे, असा निर्धारही व्यक्त केला.
ऑस्ट्रेलियातील तीन टेस्टनंतर महेंद्रसिंग धोनीनं तडकाफडकी टेस्टमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. त्यामुळं सर्वांनाच मोठा धक्का बसला. धोनीच्या निवृत्तीनंतर कसोटीच्या कर्णधारपदाची जबाबदारी कोहलीवर सोपवण्यात आली. मात्र या निर्णयामुळं आपल्याला धक्का बसल्याचं विराटनं सांगितलं.
ती घटना आठवताना विराट सांगतो, 'मला कर्णधार बनवण्याचा निर्णय जाहीर झाल्यावर काही काळानं मी ड्रेसिंग रूममध्ये गेलो. ती सीरिज पाहण्यासाठी अनुष्काही ऑस्ट्रेलियात आली होती. तिला मी या निर्णयाबद्दल सांगितल्यावर तीही अचंबित झाली. काही वेळ आम्ही दोघं शांत बसलो आणि त्यानंतर मला रडू कोसळलं. मला कधीही वाटलं नव्हतं की मी भारतीय संघाचं नेतृत्व करेन', अशा शब्दांत विराटनं आपल्या भावना मांडल्या.
वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर टीम इंडियावर बरीच टीका झाली. ती मॅच पाहण्यासाठी आलेल्या अनुष्का शर्मावरही टीकेचा वर्षाव झाला होता, अनेकांनी तिच्या उपस्थितीबाबतच प्रश्न उपस्थित केला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.