www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
सदोष ब्रेक प्रणालीमुळे होंडा कार्स इंडिया लिमिटेडने आपल्या अमेझ या सेदान प्रकारातील कारचे तर ब्रियो या हॅचबॅक वाहनाच्या विकल्या गेलेल्या ३१,२२६ गाडय़ा परत मागविल्या आहेत.
या गाड्या माघारी बोलवताना काही दोष असल्याचे कारण देण्यात आले आहे. गाड्यांची आवश्यक चाचणी आणि तपासणी करण्यासाठी या गाडय़ा मागविण्यात आल्या आहेत. २८ फेब्रुवारी २०१३ आणि १६ जानेवारी २०१४ या तारखेला तयार करण्यात आलेल्या १५,६२३ ब्रियो आणि १५,६०३ पेट्रोल इंधनावर चालणाऱ्या अमेझ कार यांचा यात समावेस आहे.
सदोष असणाऱ्या गाड्यांच्या ब्रेक तपासणीनंतर आवश्यक प्रणाली असेल तर संपूर्ण प्रक्रिया विनाखर्च होंडाच्या देशभरातील अधिकृत विक्रेत्यांकडून होईल. त्या संबंधीच्या सूचना कंपनीकडून या कारच्या खरेदीदारांना व्यक्तिगतरीत्या दिल्या जाणार आहेत.
ग्राहकांनी त्यांचे १७ आकडी `व्हेइकल आयडेंटिफिकेशन नंबर` (व्हीआयएन) कंपनीच्या वेबस्थळावरील विशिष्ट दालनांत अंकित करून, माघारी बोलाविण्यात आलेल्या कारमध्ये त्यांनी विकत घेतलेली कार आहे की नाही याची खातरजमा करून घेता येईल. याआधी मारुती सुझुकी इंडियाला तब्बल १ लाखांहून अधिक विकल्या गेलेल्या अर्टिगा, स्विफ्ट आणि डिझायर मॉडेलच्या कार माघारी बोलाविण्याचा प्रसंग ओढवला होता.
या आधी टोयोटा किलरेस्कर मोटरने आपल्या बहुपयोगी वाहन- इनोव्हाच्या ४४,९८९ गाडय़ा ग्राहकांकडून मागवून घेतल्या. गेल्या वर्षी जनरल मोटर्स इंडियाला आपल्या शेव्हरोले तव्हेरा या मॉडेलच्या १.१४ लाख मोटारी ग्राहकांकडून मागवून घ्याव्या लागल्या होत्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.