मायक्रोमॅक्स ‘लॅप टॅब’ ३० हजाराला

मोबाईल स्मार्ट फोनच्या मार्केटमध्ये मायक्रोमॅक्सनं केव्हाचीच आपली छाप पाडलीय. अगदी टॅबलेटची किफायतशीर रेंजही कंपनीने बाजारात आणलीय. आता मायक्रोमॅक्स आणखी एक फ्यूजन आविष्कार टेक्नोप्रेमींसाठी सादर करतेय. त्याचं नाव आहे लॅप टॅब... लॅप टॉप नव्हे, तर लॅप टॅब...

Updated: Jan 13, 2014, 10:58 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मोबाईल स्मार्ट फोनच्या मार्केटमध्ये मायक्रोमॅक्सनं केव्हाचीच आपली छाप पाडलीय. अगदी टॅबलेटची किफायतशीर रेंजही कंपनीने बाजारात आणलीय. आता मायक्रोमॅक्स आणखी एक फ्यूजन आविष्कार टेक्नोप्रेमींसाठी सादर करतेय. त्याचं नाव आहे लॅप टॅब... लॅप टॉप नव्हे, तर लॅप टॅब...
मायक्रोमॅक्सच्या या नव्या लॅप टॅबचं वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये ड्युअल ऑपरेटिंग सिस्टीम असणार आहे. म्हणजे अँड्रॉईड ४.२.२ जेलीबिन ओएससोबतच विंडोज ८ ही प्रणाली देखील त्यामध्ये असणार आहे. म्हणजे ज्याला अँड्रॉईड वापरायचंय, त्यांच्यासाठी अँड्रॉईड. आणि विंडोज ८ च्या चाहत्यांसाठी तो पर्याय देखील उपलब्ध आहे. ग्राहकांना एकाचवेळी दोन्ही प्रणाली वापरता येणार नाहीत. एकदा लॅप टॅब रिबूट केलं की, तुम्हाला हवा तो ऑपरेटिंग सिस्टिमचा पर्याय निवडायचा. पुन्हा दुसरा पर्याय निवडायचा असेल तर लॅप टॅब पुन्हा रिबूट करायचा. या लॅप टॅबला इंटेल प्रोसेसरची पॉवर देखील लाभलीय.
येत्या फेब्रुवारीपर्यंत मायक्रोमॅक्सचं हे नवं अपत्य बाजारात दाखल होणार आहे. टॅब आणि लॅपटॉप यांचं फ्यूजन त्यामध्ये आहे. १०.१ इंचाची हाय डेफिनेशन (एचडी) स्क्रीन, १.४६ गिगाहर्टझचा इंटेल सेलेरॉन एन२८०५ प्रोसेसर, २ जीबी रॅम आणि ७४०० एमएएच बॅटरी ही या लॅप टॅबची वैशिष्ट्ये. या लॅप टॅबमध्ये २ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही देण्यात आलाय.
व्हिडिओ कॉलिंगसाठी त्याचा चांगला वापर करता येईल. फोन, टॅब आणि कॉम्प्युटर यांचं मिश्रण असलेल्या या लॅप टॅबचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे वातावरणानुसार त्यात ब्राइटनेस नियंत्रण होतं. याची अंतर्गत क्षमता असणार आहे ३२ जीबीची. मेमरी कार्डद्वारे ती ६४ जीबीपर्यंत वाढवता येईल. त्यामध्ये ब्ल्यूटूथ आणि वायफाय देखील आहे.
परंतु या लॅप टॅबची किंमत काय असणार, याबाबत अद्याप मायक्रोमॅक्सच्या वतीनं खुलासा करण्यात आलेला नाही. कंपनीचा आजवरचा इतिहास लक्षात घेता त्याची किंमत फारशी महागडी असणार नाही, एवढं नक्की... आता ही दुहेरी जादू ग्राहकांना किती आवडते, ते पाहायचं.
................
मायक्रोमॅक्स कॅनवास लॅप टॅबची प्रमुख वैशिष्ट्ये
१०.१ इंचाची एचडी टचस्क्रीन
२ मेगापिक्सलचा फ्रंट आणि बॅक कॅमेरा
अँड्रॉइड जेलीबिन आणि विंडोज ८ दुहेरी ऑपरेटिंग प्रणाली
१.४६ गिगाहर्टझचा इंटेलचा प्रोसेसर
२ जीबी रॅम, ३२ जीबी मेमरी क्षमता

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.