www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
‘थ्री जी’नंतर आता ‘फोर जी’सुविधा भारतात लवकरच सुरू होणार आहे. हीच सुविधा ग्राहकांपर्यंत विनाअडथळा पोहचवण्यासाठी ‘भारती एअरटेल’ आणि ‘रिलायन्स जीओ’ या दोन कंपन्यांनी हात मिळवणी केलीय.
‘फोर जी’ सुविधेसाठी आवश्य असणारं लायसन्सही भारती एअरटेल आणि रिलायन्स जीओ या कंपन्यांनी मिळवलं आहे. यानंतर या दोन्ही कंपन्यानी एकमेकांसोबत ‘सहकार्य करार’ केलाय. या करारानुसार, दोन्ही कंपन्या एकमेकांचं ‘फोर जी’ नेटवर्क वापरू शकणार आहेत.
‘फोर जी’ ही सुपरफास्ट सुविधा देशभरात उपलब्ध करून देण्यासाठी या कंपन्यांना ‘फोर जी’ नेटवर्कचं जाळं संपूर्ण देशात तयार करावं लागणार आहे. यासाठी खर्चही मोठ्या प्रमाणात करावा लागेल. यासाठीच, या दोन्ही कंपन्यांनी एकत्र येऊन यावर उपाय शोधून काढलाय. भारती एअरटेलचं पायभूत नेटवर्क वापरून मुकेश अंबानी यांची रिलायन्स जीओ दूरसंचार क्षेत्रात (टेलीकॉम) पुन्हा प्रवेश करणार आहे.... सहकार्य करारामुळे रिलायन्सला ४ जी सेवा जलदगतीने पुरवता येईल तसेच पायाभूत उभारणीसाठी होणारा भरभक्कम खर्चही वाचणार आहे. एअरटेलही जिथे आवश्यकता असेल तिथे रिलायन्स जीओचे पायाभूत जाळे वापरु शकेल. एअरटेलला लायसन्स मिळालं असलं तरी केवळ आठ राज्यांपुरतीच या कंपनीची सेवा मर्यादीत असणार आहे. त्यामुळे हा करार दोन्ही कंपन्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. भारतीचं नेटवर्क जाळं वापरून या मोबदल्यात रिलायन्सकडून ठराविक रक्कम मिळणार आहे. यानुसार रिलायन्सला काही भागांमध्ये एअरटेलच्या ऑप्टिक फायबर केबल, टॉवरचा वापर करता येईल.
दोन्ही कंपन्यांचा या सुविधेसाठी होणारा खर्च कमी होणार असेल तर या दोन्ही कंपन्या ग्राहकांना ही सुविधा स्वस्त दरात उपलब्ध करून देऊ शकतात. अर्थातच, याचा फायदा मोबाईल आणि ही सुविधा वापरणाऱ्या ग्राहकांनाही होणार आहे. त्यामुळे फोर जी नेटवर्कसहीत या दोन्ही कंपन्या स्वस्त दरात कॉल आणि इंटरनेट सुविधा देतील, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे.
तुमचं सिम कार्ड इतर कंपन्यांचं असेल तर, मोबाईल पोर्टेबिलिटी सुविधेद्वारे तुम्हीही ही सुविधा आपापल्या मोबाईलवर उपलब्ध करून घेऊ शकाल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.