www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पावसात मनसोक्त भिजायचंय... पण केसांची आणि त्वचेची चिंता सतावतेय... मग, ही चिंता बाजुला ठेवा... कारण, त्यावर उपाय आहे. पण, पावसात भिजण्याचा आनंद दुसऱ्या कशातच आढळणार नाही...
पावसाळ्यात मनसोक्त भिजणं कुणाला आवडणार नाही... पण, पावसाळ्यात वारंवार पावसाच्या पाण्यात भिजल्यानं तुम्हाला विविध समस्यांना सामोरं जावं लागत असेल तर तुम्हाला स्वत:ची काळजी घेण्याची गरज आहे. ‘लूक कॉन्शिअस’ असणाऱ्यांना आपल्या चेहऱ्याबरोबरच आपल्या त्वचेचीही भीती सतावत असण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात सर्वात जास्त समस्या जाणवतात त्या त्वचेसंदर्भात आणि केसांबद्दल... म्हणूनच आज आपण पाहणार आहोत की पावसाळ्यात तुम्ही तुमची आणि तुमच्या त्वचेची काळजी कशी घ्याल...
त्वचेची चमक कमी होऊ नये म्हणून…
माईल्ड साबणाचा प्रयोग या दिवसांत खुपच फायदेशीर ठरतो. सोप फ्री क्लिंजरही बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमची त्वचा शुष्क पडणार नाही. मृत त्वचेला हटवण्यासाठी आठवड्यातून एकदा स्क्रबचा वापर करा.
मॉइश्चरायजरचा वापर...
ऋतू कोणताही असला तरी मॉइश्चरायजरचा वापर करायचं विसरू नका. त्वचेची कोमलता कायम राखण्यासाठी लोशन बेस्ड मॉइश्चरायजरचा वापर करा. जास्त मेकअप करणं टाळा. गरज असेलच तर वॉटरप्रूफ मेकअपचा वापर करावा. पायाच्या बोटांमध्ये अॅन्टी फंगल पावडर टाकायचं विसरू नका.
त्वचेची झळाळी…
चिपचिप त्वचेपासून सुटका करून घेण्यासाठी चंदन पावडर आणि गुलाब पाण्याची पेस्ट करून चेहऱ्यावर थोड्यावेळासाठी लावून ठेवा... मध आणि दह्याची पेस्टही या दिवसांत चेहऱ्यावर झळाळी आणण्याचं काम करतं.
केसांची निगा…
पावसाळा म्हणजेच केसांच्या समस्या हे तर समीकरणच आहे. केस तुटणं आणि गळणं यांसारख्या समस्यांना अनेकांना सामोरं जावं लागतं. यावेळी जेलचा वापर करणं टाळा. कारण, केसांत कोंडा असेल तर केसांच्या मुळाशी तो चिटकून राहू शकतो.
केस बांधून ठेवा....
मोठे केस असतील तर त्याची निगा राखणं मोठं जिकरीचं ठरतं. अशावेळी, बाहेर पडताना मोठ्या केसांना हलक्या पद्धतीनं का होईना पण बांधून ठेवा. छोट्या केसांसाठी क्लचर किंवा हेअर पिनचा वापर करा.
कंडिशनरचा वापर...
शॅम्पू केल्यानंतर केसांना कंडिशनरचीही आवश्यकता असते. पावसाळ्यात केसांना तेलाची चंपीही गरजेची असते. रात्री झोपताना गरम तेलासोबत हलक्या हातांनी मॉलिश करा.
लिंबाचा वापर...
केसांसाठी तुम्ही लिंबाचाही वापर करू शकता... एक मग पाण्यात लिंबू मिसळा आणि शॅम्पू केल्यानंतर केसांना या पाण्यानं धुवून टाका. लिंबूनं केसांची चमक कायम राहते. कोंडा असेल तर त्यापासूनही सुटका होते.