मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीदिनी गुगल या नामांकित सर्च इंजिनच्या होमपेजवर शिवरायांचे डुडल प्रदर्शित व्हावे, यासाठी जगभरातील शिवप्रेमींनी ऑनलाइन मोहीम सुरू केली आहे. येत्या १९ फेब्रुवारीला गुगलने डुडलद्वारे महाराजांचे कार्य दाखवावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
शिवजयंतीला आता थोडाच अवधी शिल्लक असल्याने आता #DoodleofShivray ही मोहिम आणखी तीव्र झाली आहे. यासाठी इंटरनेट युजर्सना proposals@google.com या गुगलच्या अधिकृत ई-मेलवर शिवाजी महाराजांच्या डुडलची मागणी करण्यासाठी आवाहन केले आहे.
तसेच http://change.org/shivajidoodle या लिंकवर जाऊन यूजर्स या संकेतस्थळाद्वारे डुडलसाठी समर्थन देऊ शकतात. हे संकेतस्थळ जगभरातील फोरम्सवर कार्यरत आहे. सायंकाळपर्यंतच सुमारे १५ हजार शिवप्रेमींनी याला पाठिंबा दर्शविला होता.
सोशल मीडियावरही #DoodleofShivray या हॅशटॅगद्वारे या मागणीचा "ट्रेंड‘ जगभरात पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आज सायंकाळी सहा ते रात्री नऊ दरम्यान हॅशटॅगद्वारे माध्यमे आणि जगभरातील नेटिझन्सपर्यंत शिवरायांचे कार्य पोहचवून सर्वांनाच या डुडलच्या मोहिमेत सामावून घेण्यासाठी करताना दिसत आहेत.