विशाल करोळे, औरंगाबाद : युसिमास अबॅकस स्पर्धा नुकतीच पार पडली. ५६ देशांच्या पाचशेहून जास्त स्पर्धकांवर मात केली ती एका अंध मुलानं... औरंगाबादच्या प्रणित गुप्ता या १५ वर्षीय मुलानं ही लाजवाब कामगिरी केलीय. ही कामगिरी करतानाच त्यानं इतिहासही घडवलाय. स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका भारतीयानं विजयाचा झेंडा रोवलाय.
तबला वाजवणाऱ्या प्रणित गुप्तानं डोळसांनाही लाजवेल अशी लाजवाब कामगिरी केलीय. 'जागतिक युसिमास अबॅकस स्पर्धे'त प्रणितनं अजिंक्यपद पटकावलंय. जन्मापासून अंध असलेल्या प्रणितच्या भविष्याची चिंता त्याच्या पालकांना होती. पण काही वर्षांतचं प्रणितची बुद्धिमत्ता त्यांना लक्षात आली. त्यामुळे त्यांनी प्रणितला अंधांच्या शाळेत टाकलंच नाही. सामान्य मुलांच्या शाळेत त्याला शिक्षकांनीही मदत केली. अशातच प्रणितनं अबॅकसच्या ट्युशनला प्रवेश घेतला. त्यानंतर त्याचं जगच पालटलं. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकाराचं अगदी सेकंदात त्याच्या कडून उत्तर मिऴायचं. त्याची ही क्षमता पाहून शिक्षकांनीही हा हिरा चमकवण्यासाठी आणखी मेहनत घेतली. प्रणितच्या या यशानंतर वडील मनोज गुप्ता आणि आई चित्रा गुप्ता यांना तर आकाशच ठेंगणं झालंय.
फक्त गणिताची आकडेमोडच नाही तर प्रणितची बोट तबल्यावरही मस्त वाजतात. पाच परीक्षाही त्यानं उत्तीर्ण केल्यात. प्रणित गाणीही छान गातो. गायनाच्या दोन परीक्षा त्यानं उत्तीर्ण केल्यात. आता तो तयारी करतोय हार्मोनियम शिकण्याची. ब्रेल मशिनवर टाईपिंगची कलाही त्यानं अवगत केलीय.
वडिलांप्रमाणे इंजिनिअर होण्याचं प्रणितचं स्वप्न आहे. प्रणित यशाची एक एक शिखर सर करतोय. त्यामुळे त्याच्या लहान भावंडांसाठी तो प्रेरणास्थान बनलाय.