मुंबई : अनेक जण नशेत गाडी चालवतात आणि अपघाताला निमंत्रण देतात. आता यापुढे दारु पिऊन होणारे अपघात टळणार आहे. कारण दारु प्यायलेला चालक आपली गाडीच सुरु करु शकणार नाही. गाडी सुरु करण्याचा प्रयत्न केला तरीही गाडी सुरुच होणार नाही.
हो हे शक्य आहे, गाड्यांना स्मार्ट बनवणारं असे भन्नाट तंत्रज्ञान ठाण्यातल्या चार विद्यार्थिनींनी शोधून काढले आहे. त्यांनी 'अल्कोहोल अॅण्ड स्लीप वॉर्निंग सिस्टीम'च्या मदतीने गाड्यांना स्मार्ट बनवण्याचं नविन तंत्रज्ञान शोधले आहे. या चार विद्यार्थिनी ठाण्यातील व्ही. पी. एम पॉलिटेक्निकच्या आहेत.
या नविन तंत्रज्ञानामुळे, दारु प्यायलेली व्यक्ती गाडी सुरू करु शकणार नाही. तसेच गाडी वेगात असेल आणि चालकाला डुलकी लागली तरी गाडीचा वेग कमी होईल आणि धोक्याचा इशारा हे नविन तंत्रज्ञान देईल. एमएसबीटीने पवईतल्या एल अँड टी टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये घेतलेल्या स्पर्धेत हा प्रोजेक्ट पहिल्यांदा सादर करण्यात आला होता. त्यावेळी हे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
सायली कांबळे, पूजा मोरे, प्रज्ञा सावंत आणि रोशनी काव्यश्वर यांनी 'अल्कोहोल अॅण्ड स्लीप वॉर्निंग सिस्टीम'चं हे अनोखं मॉडेल तयार केलं आहे. कम्प्युटर इंजिनीअरिंगच्या या विद्यार्थिनी असून त्यांना कॉलेजच्या प्राध्यापिका सुहासिनी शुक्ला यांनी मार्गदर्शन केले. आम्ही अपघात टाळण्यासाठी हे सर्व केलेय, असे त्या चौघी सांगतात.
परदेशातील ब्रँडेड गाड्यांमध्ये हे तंत्रज्ञान वापरलं जाते. मात्र या चौघींनी बनवलेलं हे तंत्रज्ञान बनवण्यासाठी त्यांना फक्त चार हजार रुपये खर्च आला आहे. कोणत्याही ब्रँडच्या गाडीमध्ये थोड्याफार अपडेशनसह ही सिस्टीम लावता येऊ शकते. त्यामुळे हे तंत्रज्ञान सामान्यांना परवडणारं आहे.
या कसा होणार वापर?
दारु सेवन केलेली व्यक्ती स्टिअरिंगवर चावी लावून गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करेल. मात्र, स्टिअरिंगवर लावण्यात आलेल्या एमक्यू-थ्री या गॅस सेन्सरला चालकाच्या श्वासातून अल्कोहोलचं प्रमाण समजेल. प्रमाण जास्त असेल तर गाडीच्या इग्निशनमध्ये अडथळा निर्माण होऊन गाडी सुरू होणार नाही. मात्र दारु न घेतलेल्या व्यक्तीला गाडी सहज सुरू करता येईल.
तसंच एखाद्या हेअर बॅण्डप्रमाणे दिसणारं डिव्हाइस डोक्यावर लावून गाडी चालवत असल्यास एक्स्लोमिटरच्या मदतीने, ड्रायव्हरला डुलकी असल्यास इतर प्रवाशांना त्यांबद्दलची सूचना मिळते. तसंच गाडीचा वेग आपोआप कमी होऊन अपघात धोका टळेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.