महाराष्ट्र केसरी कुस्तीत नेमका वाद कशामुळे झाला? पैलवान शिवराज राक्षेची पंचांवर दादागिरी

Maharashtra Kesari Kusti 2025 : अहिल्यानगर येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ, आमदार संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशनच्यावतीने  महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मात्र यात गादी विभागात झालेल्या अंतिम लढतीत पराभूत झालेल्या पैलवान शिवराज राक्षेने पंचांवर दादागिरी केली. मात्र हा वाद नेमका कशामुळे झाला हे जाणून घेऊयात. 

Pooja Pawar | Feb 02, 2025, 20:45 PM IST

 

 

1/7

मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत रविवार अंतिम सामना पार पडणार होता. मात्र त्यापूर्वी गादी विभागातील अंतिम लढत नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात तर माती विभागातील अंतिम लढत सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यात पार पडली. 

2/7

माती विभागातील अंतिम लढतीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने विजय मिळवला. तर गादी विभागातील अंतिम लढतीत पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ याने  नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा पराभव केला. मात्र शिवराज राक्षे याला हा पराभव मान्य झाला नाही. 

3/7

मात्र गादी विभागातील या पराभवानंतर पैलवान शिवराज राक्षे आक्रमक झाला आणि त्याने थेट पंचांना मारहाण केली. त्यामुळे काका पवारसह इतर पैलवानांनी पंचांच्या निर्णयावर आक्षेप नोंदावला. खेळाडूंनी मैदानातच वाद घातला. त्यामुळे पोलिसांना देखील मध्यस्थी करावी लागली. 

4/7

पैलवान शिवराज राक्षेने त्याने थेट पंचांशी वाद घातला. यावेळी शिवराजने पंचांची कॉलर पकडली आणि त्यांना लाथ मारली. सदर दृश्य कॅमेऱ्यात सुद्धा कैद झाले. या वादानंतर काहीकाळ स्पर्धेत गोंधळ पाहायला मिळाला. त्यानंतर पोलिसांनी शिवराज राक्षेला मैदानातून बाहेर काढण्यात आलं.

5/7

गादी विभागातील अंतिम लढतीत पराभव आणि पंचांना केलेल्या मारहाणीवर शिवराज राक्षे याने प्रतिक्रिया दिली. माझे दोन्ही खांदे टेकले नव्हते, पाठही टेकली नव्हती. तरीही मला पराभूत केलं. रिव्ह्यूचा निर्णयही ऐकून घेण्यात आला नाही असा आरोप शिवराज राक्षेने केला. मी तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकू नये म्हणून माझ्यावर अन्याय करण्यात आला असा आरोप शिवराज राक्षेने केला. मला पराभूत करण्यासाठी हे जाणूनबुजून करण्यात आलं. त्यावर आपण रिव्ह्युची मागणी केली आहे. सामन्याचा व्हिडीओ पाहून त्यावर निर्णय द्यावा अशी मागणी आम्ही केली आहे. 

6/7

पैलवान शिवराज राक्षे हा मुळचा पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमधील राक्षेवाडीचा आहे. शिवराज राक्षे हा मूळचा राजगुरुनगरच्या राक्षेवाडीचा असून त्याला कुस्तीचं बाळकडून घरातच मिळालं होतं. त्याचे वडील आणि आजोबा पैलवान होते.

7/7

महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या अंतिम लढतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेत्यास मानाच्या चांदीच्या गदेबरोबरच आमदार संग्राम जगताप यांच्यावतीने थार ही अलिशान चारचाकी गाडीही देण्यात येणार आहे. तसेच उपविजेत्या कुस्तीगीरास बोलेरो ही चारचाकी गाडी देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव डॉ.संतोष भुजबळ यांनी दिली.