मोहम्मद शमीचा बांगलादेशला जोरदार पंच, वनडेत सर्वात जलद 'डबल सेंच्युरी' करणारा जगातला पहिला गोलंदाज

Mohammad Shami : दुखापतीतून कमबॅक करणाऱ्या मोहम्मद शमीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात जबरदस्त गोलंदाजी करून इतिहास रचला आहे. बांगलादेशच्या तब्बल ५ खेळाडूंना माघारी धाडत शमीने टीम इंडियासाठी मोलाचं योगदान दिलं. यासह सर्वात जलद 'डबल सेंच्युरी' करणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला. 

Pooja Pawar | Feb 20, 2025, 18:56 PM IST
1/7

19 फेब्रुवारी पासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ला (Champions Trophy 2025) सुरुवात झालेली आहे. यंदा ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवण्यात येणार असून याचे सामने पाकिस्तान आणि दुबईत खेळवले जातील. टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीतील त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहेत.   

2/7

20 फेब्रुवारी रोजी टीम इंडिया (Team India) स्पर्धेतील पहिला सामना बांगलादेश विरुद्ध खेळत आहे. बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने टॉस जिंकला असून त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर भारताला प्रथम गोलंदाजीचे आव्हान दिले.   

3/7

बांगलादेशला पहिल्या इनिंगमध्ये 228 धावांवर ऑल आउट करण्यात टीम इंडियाला यश आले. यात भारतीय गोलंदाजांपैकी मोहम्मद शमीने सर्वाधिक 5, हर्षित राणाने 3 तर अक्षर पटेलने 2 विकेट्स घेतल्या. नवव्या ओव्हरला भारताने 35 धावांवर 5 विकेट्स घेतल्या होत्या. 

4/7

मोहम्मद शमीने बांगलादेशच्या सौम्या सरकार, मेहदी हसन मिराज, जाकर अली, तंजीम हसन साकिब, तस्किन अहमद या 5 फलंदाजांना बाद केले. यापैकी सौम्या सरकार आणि तंजीम हसन साकिब यांना शुन्यावर बाद करण्यात शमी यशस्वी झाला. 

5/7

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात केलेल्या या दमदार कामगिरीमुळे मोहम्मद शमीने अनेक रेकॉर्डस् आपल्या नावे करून इतिहास रचला आहे. शमी वनडेमध्ये सर्वात जलद 200 विकेट्स घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरलाय. त्याने 200 विकेट्सचा टप्पा 5126 बॉलमध्ये पूर्ण केला.   

6/7

यासह मोहम्मद शमीने भारताचा माजी गोलंदाज झहीर खान याच्या रेकॉर्डला सुद्धा मागे टाकलं असून तो भारतासाठी लिमिटेड ओव्हर फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरलाय. मोहम्मद शमीने 72 विकेट्स घेतले असून यापूर्वी हा रेकॉर्ड 71 विकेट घेणाऱ्या झहीर खानच्या नावे होता. 

7/7

भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी 229 धावांचे आव्हान दिले आहे. बांगलादेश विरुद्ध पहिला सामना जिंकणं टीम इंडियासाठी अत्यंत महत्वाचं ठरणार आहे.