पुणे : 'राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलीकडं इतिहासाचं आकलन नाही. तसंच, त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचंही आकलन नाही. राजकारणात कुठलंही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करतोय,' अशी टीका संभाजी बिग्रेडने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे.
संभाजी बिग्रेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका करीत फेसबुक पोस्ट लिहिली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभरीत पदार्पण केल्याबद्दल नुकतेच राज ठाकरे यांनी त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला होता. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत राज यांनी राजकारणातील जातीयवादावर भाष्य केलं होतं.' राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाल्यापासून राज्यात जातीय अस्मिता टोकदार झाल्या जात ही पुढाऱ्यांची ओळख बनली' अशी टीका राज यांनी केली होती. जेम्स लेनला मराठा तरुण-तरुणींपर्यंत कुणी पोहोचवलं? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.
राज ठाकरेंच्या वक्तव्यावर संभाजी बिग्रेडच्या प्रवीण गायकवाड यांनी टीका करीत म्हटले आहे की, 'राज यांनी ब्राम्हणत्व स्वीकारून प्रबोधनकारांचा वारसा सोडून दिला की काय? पुरंदरेंच्या विकृत लिखाणाचे समर्थन करताना राज इथल्या पुरोगामी चळवळींवर टीका करतात. इतिहासाची मांडणी करताना, अटकेपार झेंडे पेशव्यांनी लावले आणि मराठ्यांचे पानिपत झाले'. म्हणजे विजयाचे श्रेय ब्राम्हण पेशव्यांना दिले जाते आणि पराभव मात्र मराठ्यांच्या माथी मारला जातो. हा जातीय दृष्टीकोनातून लिहलेला इतिहास नाहीतर दुसरे काय असा सवाल गायकवाड यांनी केला. तसेच आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी पुरंदरेंच्या इतिहासलेखनाबाबत काय मते नोंदवली आहेत याचा तरी अभ्यास करायला हवा,' असेही गायकवाड यांनी म्हटले आहे.
प्रवीण गायकवाड यांची पोस्ट जशीच्या तशी...
महाराष्ट्रातील संघर्ष हा प्रामुख्याने सांस्कृतिक स्वरुपाचा संघर्ष राहिला आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांच्या प्रशासनात संधी, अधिकार, प्रतिष्ठा आणि वर्चस्व मिळवण्यासाठी ब्राह्मण आणि कायस्थ यांच्यात सुप्त संघर्ष होता. सामाजिकदृष्ट्या ब्राह्मण हे कायस्थांना आपल्यापेक्षा कमी लेखायचे आणि त्यांचा द्वेष करायचे. या संघर्षाचे मूळ महाराजांच्या राज्याभिषेकात होते. ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांच्या क्षत्रियत्वावर आक्षेप घेऊन त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता, तर दुसऱ्या बाजूला कायस्थांनी महाराजांचा राज्याभिषेक झाला पाहिजे अशी भूमिका ठाम घेताना राज्याभिषेकासाठी संपूर्ण सहकार्य केले होते. तात्पर्य असे की हा सांस्कृतिक संघर्ष महाराष्ट्राला नवा नाही, तो जुनाच आहे.
१८९९ साली वेदोक्त प्रकरण घडले. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच राजर्षी शाहू महाराजांच्याही क्षत्रियत्वावर आक्षेप घेण्यात आला. त्यांना वेदोक्ताचा अधिकार नाही म्हणत ब्राह्मणांनी त्यांना टोकाचा विरोध करायला सुरुवात केली. या ब्राह्मणी छावणीचे नेतृत्व टिळक, राजवाडे अशा ब्राह्मण पुढाऱ्यांनी केले. या प्रसंगात देखील कायस्थ शाहू महाराजांसोबत उभे राहिले. पुढे वेदोक्त प्रकरणामुळे महाराष्ट्रात ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळीचा जन्म झाला. या चळवळीतून उभा राहिलेला सांस्कृतिक संघर्ष हा महाराष्ट्रातील मूळ संघर्ष आहे. या संघर्षात प्रबोधनकार ठाकरेंनी राजर्षी शाहू महाराजांची बाजू घेतली. सुरुवातीला हा संघर्ष शाहू महाराज विरुध्द टिळक असा चालला. पुढच्या काळात त्याला प्रबोधनकार ठाकरे विरुद्ध न.चि. केळकर असे स्वरुप प्राप्त झाले. त्यातून प्रबोधनकार ठाकरे हे ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळीचे प्रमुख नेतृत्व म्हणून उदयाला आले. मुंबई, पुणे, नाशिक भागात त्यांनी या चळवळ रुजवण्याचे काम केले.
ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळीची मांडणी करताना प्रबोधनकारांनी अत्यंत जहाल भाषेत ब्राह्मण आणि ब्राह्मण्यावर टीका केली. १९९५-९९ दरम्यान महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना त्यांनी प्रबोधनकारांचे हे साहित्य प्रकाशित केले. महाराष्ट्रभर त्याचा प्रचार प्रसार केला. प्रबोधनकारांच्या साहित्यातून त्यांचे जहाल विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेले. लोकांना प्रबोधनकारांचा विचार भावला. त्यातून जी तरुण पिढी घडली ती आपसूक ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळीकडे आकृष्ट झाली. त्यांना लेखणीकडे बघण्याची आणि लिखाणातील Between The Lines अर्थ समजून घेण्याची दृष्टी मिळाली. त्याचकाळात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्या चळवळीचे कार्यही याला पूरक असेच सुरु होते. त्यांनीही प्रबोधनकारांचा हा विचार स्वीकारला. प्रबोधनकारांनी जी दृष्टी दिली होती, त्यामुळे जेम्स लेनचे लिखाण कुठल्या विकृत मेंदूतून आले हे इथल्या तरुणांना ओळखता आले आणि त्यातूनच भांडारकर प्रकरण घडले.
ब्राह्मणांनी कायस्थांना शूद्र ठरवल्यामुळे प्रबोधनकार ठाकरे राजर्षी शाहू महाराजांच्या बाजूने आले होते. मात्र आता राज ठाकरे यांनी ब्राह्मणत्व स्वीकारुन आपला प्रबोधनकारांचा वारसा सोडून दिला की काय असा प्रश्न पडतो. आज पुरंदरेंच्या विकृत लिखाणाच्या समर्थनार्थ रक्त आटवताना राज ठाकरे इथल्या पुरोगामी चळवळींवर टीका करतात. परंतु इथल्या इतिहासाचे लेखन हे जातीय दृष्टिकोनातून झाल्याचे मान्य करत नाहीत. त्यांच्या माहितीसाठी एकच उदाहरण पुरेसे आहे. इतिहासाची मांडणी करताना "अटकेपार झेंडे पेशव्यांनी लावले आणि मराठ्यांचे पानिपत झाले" अशी चलाखी केली जाते. म्हणजे विजयाचे श्रेय ब्राह्मण पेशव्यांना दिले जाते आणि पराभव मराठ्यांच्या माथी मारला जातो. हा जातीय दृष्टिकोनातून लिहलेला इतिहास नाहीतर दुसरे काय आहे ?
२००३ मध्ये जेम्स लेनच्या लिखाणानंतर महाराष्ट्रात शिवप्रेमींचा विरोध सुरु झाला. जेम्स लेनला विकृत लिखाणासाठी मदत केल्याच्या रागातून पुण्यात शिवसेनेच्या निष्ठावान शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी श्रीकांत बहुलकारांना काळे फासले. तेव्हा शिवसेनेविषयी शिवप्रेमींना एक आस्था निर्माण झाली होती. परंतु त्यावेळी सेनेत असणाऱ्या राज ठाकरेंनी पुण्याला येऊन हात जोडून बहुलकरांची माफी मागितली. शिवसेनेचे तत्कालीन शहराध्यक्ष रामभाऊ पारेख यांचा तडकाफडकी राजीनामा घेतला. राज ठाकरेंच्या या वैयक्तिक भूमिकेमुळे शिवसेनेला अनेक कार्यकर्त्यांची नाराजी घ्यावी लागली होती. राज ठाकरेंनी कधीतरी पुरंदरेंना आपण सोलापूरच्या जनता बँक व्याख्यानमालेत जेम्स लेनच्या पुस्तकाचा प्रचार का केला होता आणि तुमच्या “पुरंदरे प्रकाशन” या संस्थेने जेम्स लेनच्या पुस्तकाचे वितरक म्हणून काम केले होते का हे प्रश्न विचारण्याचे धाडस केले पाहिजे. हे जमणार नसेल तर निदान आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी पुरंदरेंच्या इतिहासलेखनाबाबत काय मते नोंदवली आहेत याचा तरी अभ्यास करायला हवा.
१८९९ चे वेदोक्त प्रकरण ते १९९९ ची राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना या दरम्यानचा काळ शंभर वर्षांचा आहे. या शंभर वर्षांच्या काळात झालेल्या मूळ सांस्कृतिक संघर्षाकडे दुर्लक्ष करुन राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर जातीचा मुद्दा मोठा झाला असे विधान करुन भलताच संघर्ष निर्माण करु पाहत आहेत. खरेतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आडून शरद पवारांवर टीका करुन त्यांची बदनामी करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. राज ठाकरेंनी राजकीय स्वार्थासाठी पवारांवर टीका करुन दिशाभूल करण्याऐवजी महाराष्ट्राच्या राजकीय स्थित्यंतराचा थोडासा अभ्यास केला तर अनेक गोष्टींचा त्यांना उलगडा होईल. राष्ट्रवादीच्या स्थापनेच्या अनेक वर्ष आधीच भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणात जातीच्या मुद्द्याला जन्म घातला आहे. भाजपने माधवं या राजकीय सूत्राचा अवलंब करुन राज्यात विभागवार माळी, धनगर, वंजारी समाजातील नेतृत्वं उभी केली आणि त्यांच्या आडून "मराठा वगळून राजकारण" हा डाव खेळला.अर्थातच हा सगळा आरएसएस आणि पर्यायाने ब्राह्मणी मेंदूतून आलेला राजकीय विचार होता. राजकारणाच्या माध्यमातून जातीय संघर्षास खो घालणाऱ्या भाजपच्या त्या नितीविषयी राज ठाकरे कधी बोललेले दिसून येत नाहीत. १९८० नंतर महाराष्ट्रात मंडल कमिशनला विरोध करुन उभा केलेला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष, नामांतर प्रकरणात उभा केलेला मराठा विरुद्ध दलित संघर्ष, हे जरी राजकीय स्वरुपाचे असले तरी त्यात जातीचा मुद्दा केंद्रस्थानी होता. राज ठाकरे या इतिहासाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात.
राज ठाकरेंना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत दिसत आहे. ठीक आहे, परंतु हा संघर्ष उभा करत असताना त्यांना १८९९ ते १९९९ या शंभर वर्षाच्या काळात महाराष्ट्रात झालेल्या सांस्कृतिक संघर्षाचा आणि आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या वारशाचा विसर पडला आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. त्यांची सध्याची जी काही मांडणी आहे, ती प्रबोधनकार ठाकरेंच्या ब्राह्मणेतर विचारांपासून फारकत घेणारी आणि पुरंदरेंच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या विचारणसरणीला जवळ करणारी आहे हे मात्र नक्की !