Ganesh Visarjan 2024 : अबालवृद्धांचा उत्साहाचा सण म्हणजे बाप्पाच आगमन म्हणजेच गणेशोत्सव...अख्खा देशात काय विदेशातही गणेशोत्सवाची धूम पाहिला मिळत आहे. मोठ्या मोठ्या मंडपात गणराया विराजमान आहेत. घरगुती दीड, पाच आणि गौरी गणपतीच विसर्जन झालं आहे. मोठ्या गणेश मंडळासोबत असंख्य लोकांकडे बाप्पाचं विसर्जन अनंत चतुर्दशीला करण्यात येतं. अशात घरात जर कोणी गर्भवती महिला असेल तर गणपतीचं विसर्जन करावं की नाही? त्यासोबत अचानक घरात कोणाचा मृत झाला आणि सुतक सुरु असेल तर बाप्पाचा विसर्जन कसं करणार अशी अनेक प्रश्न भक्तांना पडतो. गावांमध्ये अशी प्रथा आहे की, घरात गर्भवती महिला असेल तर गणपतीच विसर्जन करत नाही. ती मूर्ती घरात ठेवून पुढच्या वर्षी दोन गणेशाची पूजा करुन मग एकत्र दोघांचं विसर्जन करण्यात येतं. याबाबत बरेच समज-गैरसमज पाहायला मिळतात. पण शास्त्र काय सांगत याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.
पंचांगकर्ते ओंकार मोहन दाते आणि आनंदी वास्तू, ज्योतिषचार्य आनंद पिंपळकर यांनी याबद्दलचा माहिती दिली आहे. ते म्हणतात की, गर्भवती महिलेचा आणि गणपतीचा काहीही संबंध नाही. घरामध्ये गर्भवती महिला असतानाही गणपती विसर्जन करावे. अशा वेळेस विसर्जन न करण्याची प्रथा चुकीची आहे. ही प्राणप्रतिष्ठा करून बसविलेली मूर्ती उत्तरपूजा करून देव्हार्यातून खाली काढतात आणि तिचे पाण्यात विसर्जन करण्यात यावे. चुकीची रुढी परंपरा पुढे नेऊ नये, असं ते आवर्जून सांगतात.
सुतक चालू असल्यास गणपती बसवला जात नाही. मात्र गणेशाची प्राणप्रतिष्ठापणा झाल्यानंतर जर घरात कोणाचा मृत झाला असेल तर गणपती विसर्जन कसं करावं? याबद्दल आनंद पिंपळकर यांनी सांगितलंय. ते म्हणतात अशा वेळी, शेजारी राहणाऱ्या व्यक्ती किंवा मित्रमंडळापैकी कोणाकडून गणरायाची पूजा अर्चा करावी. त्याला गूळ खोबराचे नैवेद्य दाखवावा. विसर्जनाची घाई करु नये. त्याशिवाय तुम्ही एखाद्या गुरुजीकडून गणेशाची पूजा करुन विसर्जन करू शकता.
अनंत चतुर्दशीला गणेशाला निरोप दिला जाणार आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी मोदक आणि त्या दिवशी तयार केलेल्या जेवणाचा नैवेद्य बाप्पाला दाखवावा. गणपतीची मूर्ती संपूर्ण घरातून फिरवावी आणि त्यानंतर घराच्या मुख्य दारावर धान्याच माप ठेवून ते आतल्या बाजूला रित करावं. मग पुढे विसर्जनासाठी जावं. बाप्पाला निरोप दिल्यानंतर ताटावर त्या ठिकाणाची माती किंवा वाळू घरी आणावी. ज्याठिकाणी बाप्पा बसवला असतो तिथे ठेवावी किंवा घरातील चार कोपऱ्यात ठेवावी.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)