Tulsi Vivah 2024 Date : आपली संस्कृती मानवतेवर, सृष्टीवर प्रेम करणारी आहे. चराचर सोयरे व्हावेत अशी अपेक्षा ज्ञानदेवांनी व्यक्त केली आहे. वनस्पती प्रेम हा त्यातील एक भाग आहे. तुळस ही एक अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे. हिंदू महिलांना तुळशीच्या पूजेचे महत्त्व फार वाटतं. तुळस आरोग्यदायक औषधी वनस्पती आहे. दारात तुळशी वृंदावन असणे ही हिंदू घर असल्याची महत्त्वाची खूण मानली जाते. अनेक जण तुळशी विवाह हा सण दिवाळीचाच एक भाग समजून तितक्याच उत्साहाने साजरा करतात.
पंचांगानुसार कार्तिक एकदशी तिथी 12 नोव्हेंबरला, मंगळवारी संध्याकाळी 6.42 मिनिटांपासून ते 13 नोव्हेंबर, बुधवारी संध्याकाळी 7.24 मिनिटांपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार, 13 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी तुळशी विवाह साजरा केला जाईल.
कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीपासून ते कार्तिक शुक्ल पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केला जातो. त्यानुसार 13 नोव्हेंबरपासून 15 नोव्हेंबपर्यंत तुळशी विवाह असणार आहे.
तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त 13 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5.29 मिनिटांपासून ते संध्याकाळी 7.53 मिनिटांपर्यंत असणार आहे.
भगवान श्रीकृष्णांची तुला करताना एका पारड्यात भगवान श्रीकृष्ण आणि दुसऱ्या पारड्यात त्यांच्या वजनाचे दागिने, मुद्रा त्यांच्या सर्व पत्नींनी घातले तरी तुला पूर्ण होत नव्हती. त्यावेळेस सत्यभामाने एक तुळशीचे पान त्यावर ठेवलं. त्याचबरोबर अलंकाराचे ते पारडे ताबडतोब खाली आले. तुळशीच्या पवित्र आणि निष्काम प्रेमामुळे ती तुला पूर्ण होऊ शकली. तेव्हा आशीर्वाद म्हणून भगवान विष्णूंने तिला पत्नी स्वरुपाचा मान दिला. प्रत्येक वर्षी आधी माझा विवाह तुळशीशी होईल आणि त्यानंतर इच्छीक इतर वधुवरांचं विवाह होतील. असा आशीर्वाद दिला त्याप्रमाणे आजपर्यंत ती प्रथा सुरू आहे.
तुळसी श्रीर्महालक्ष्मीर्विद्याविद्या यशस्विनी।
धर्म्या धर्मानना देवी देवीदेवमन: प्रिया।।
लभते सुतरां भक्तिमन्ते विष्णुपदं लभेत्।
तुळसी भूर्महालक्ष्मी: पद्मिनी श्रीर्हरप्रिया।।
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)