मुंबई : भारतीय क्रिकेट टीमची २०१८ या वर्षाची दक्षिण अफ्रिका दौऱ्यापासून सुरुवात झाली आणि वर्षाचा शेवट ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या तिसऱ्या टेस्ट मॅचनं होणार आहे. भारतीय टीमसाठी २०१८ हे वर्ष समिश्र असं राहीलं. या वर्षात भारतीय टीमनं काही वादग्रस्त निर्णय घेतले. या निर्णयाचा मोठा फटका भारतीय टीमला मोजावा लागला. या निर्णयांची चांगलीच चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली. एवढच नाही तर टीममध्ये अंतिम ११ खेळाडूंची निवड करण्यावरुन देखील अनेकदा नाराजी व्यक्त करण्यात आली. २०१८ या वर्षात भारतीय टीमच्या नेमक्या काय चुका झाल्या पाहूयात.
दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्याआधी परदेशात अजिंक्य रहाणे देखील विराट कोहलीसारखाच यशस्वी होता. SENA देश म्हणजेच दक्षिण अफ्रिका इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशात रहाणेची सरासरी 48.59 एवढी होती. एवढी चांगली कामगिरी केल्यानंतर देखील केपटाउन येथे झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचसाठी रहाणेला अंतिम-११ खेळाडूंमध्ये निवडण्यात आलं नाही. त्याऐवजी रोहीत शर्माला संधी देण्यात आली.
रोहीत शर्माला ही संधी त्याची कामगिरी पाहून देण्यात आली होती. रोहितने या सीरिजमधल्या लागोपाठ २ टेस्ट मॅच खेळल्या. या २ टेस्ट मॅचच्या ४ इनिंगमध्ये त्यांनं अवघे ७८ रन केले. यानंतर त्याला टीमबाहेर बसावे लागले. जोहान्सबर्ग मध्ये झालेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये रहाणेला संधी मिळाली. जोहान्सबर्ग सारख्या कठीण खेळपट्टीवर रहाणेने ४८ रनची मह्त्वपूर्ण खेळी केली.
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या टेस्ट सीरीजमधील सेंचुरियन टेस्टमधून भुवनेश्वर कुमारला बाहेर बसवण्यात आले. भुवनेश्वर कुमारने पहिल्या टेस्टमध्ये उत्तम कामगिरी केली होती. यानंतरदेखील सेंच्युरिअनला खेळल्या गेलेल्या टेस्टमध्ये भूवनेश्वरऐवजी ईशांत शर्माला संधी देण्यात आली. कर्णधार विराट कोहलीच्या सांगण्यानुसार हा निर्णय खेळपट्टीमध्ये असलेली उसळी आणि ईशांत शर्माची उंची लक्षात घेऊन घेण्यात आला होता. अंतिम-११ खेळाडूंमध्ये ईशांत शर्माला खेळवण्याचा निर्णय यशस्वी ठरला नाही. यानंतर वांडरर्स मध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये भुवनेश्वरचं पुनरागमन झालं आणि या टेस्टच्या विजयाचा तो शिल्पकार ठरला.
इंग्लंडसोबत होणाऱ्या सीरिजसाठी जास्तीत जास्त सराव व्हावा यासाठी चेतेश्वर पुजारा इंग्लंडमधली काउंटी यॉर्कशायरकडून खेळला. पण त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. या कामगिरीमुळे त्याला एजबेस्टन टेस्टमध्ये संधी देण्यात आली नाही. एसेक्स विरुद्ध झालेल्या सराव सामन्यात के. एल. राहूल आणि मुरली विजय यांनी अर्धशतक झळकावले. यामुळे त्यांना अंतिम-११ खेळाडूंमध्ये संधी देण्यात आली. याव्यतिरिक्त शिखर धवनला देखील संधी देण्यात आली. पण हे तीन्ही खेळाडू एजबेस्टन टेस्टमध्ये चमकदार कामगिरी करु शकले नाहीत. यानंतर उरलेल्या सीरिजसाठी पुजाराचं टीममध्ये पुनरागमन झाले. पुजाराने ट्रेंटब्रिज टेस्टमध्ये अर्धशतक तर साउथैम्पटनला शतकी कामगिरी केली. तेव्हापासून पूजाराला टीमबाहेर बसण्याची वेळ आली नाही. पण संपूर्ण वर्षभर शिखर धवन, मुरली विजय आणि के. एल. राहुल यांना सूर गवसला नाही.
इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या मर्यादित ओव्हरच्या मॅचमध्ये कुलदीप यादवने आपल्या स्पिनच्या जादूने धमाल उडवली होती. अशातच इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये आश्विन ने ७ विकेट घेतले होते. त्यामुळे भारतीय टीमनं लॉर्डसवर होणाऱ्या दूसऱ्या टेस्टसाठी २ स्पिनरसोबत खेळण्याचा निर्णय घेतला आणि कुलदीप यादवला संधी दिली. लॉर्डसची स्विंग होणारी खेळपट्टी आणि ढगाळ वातावरणातही फास्ट बॉलरऐवजी स्पिनरला संधी देणं भारताला चांगलंच महागात पडलं. या मॅचमध्ये भारताच्या स्पिनरना एकही विकेट मिळाली नाही. या मॅचमध्ये भारताचा इनिंग आणि १५९ रननी पराभव झाला. २०१८ या वर्षातला भारताचा हा सगळ्यात मोठा पराभव होता.
टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात ही घटना घडण्याची ही तिसरीच वेळ. भारतीय टीम एकही स्पिनर न घेता मैदानात उतरली होती. या तीन पैकी दोन वेळा भारतीय टीमचं नेतृत्व विराट कोहलीनं केलं होतं. नुकत्याच ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पर्थ टेस्ट मॅचमध्ये ही भारतीय टीम मुख्य स्पिनरशिवाय खेळत होती.
पर्थच्या ऑप्टस स्टेडिअमच्या खेळपट्टीवरील गवतामुळे विराटचा गोँधळ उडाला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात विराटचा जोहान्सबर्ग खेळपट्टीची अभ्यासपूर्वक माहिती घेतल्यानंतर ५ फास्ट बॉलर खेळवण्याचा निर्णय यशस्वी ठरला होता. हा निर्णय यशस्वी ठरल्याने विराटचा विश्वास वाढला आणि त्याने पर्थ टेस्टसाठी देखील ४ फास्ट बॉलर खेळवले. पण हा निर्णय मात्र भारतीय टीमच्या चांगलाच अंगाशी आला. या मॅचमध्ये भारताचा १४६ रननी पराभव झाला.