मुंबई : ऑस्ट्रेलियन खेळाडू अँड्र्यू सायमंड्सच्या निधनाची बातमी समोर येताच जगभरात शोककळा पसरली आहे. 46 वर्षीय खेळाडूचा 14 मे रोजी रात्री कार अपघात झाला, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. जगातील महान ऑलराउंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. दरम्यान यानंतर आता एका व्यक्तीने सायमंडला वाचवण्याचा प्रयत्न केला असल्याचा खुलासा केला आहे.
वायलन टाऊनसन असं या स्थानिक व्यक्तीचं नाव आहे. या व्यक्तीच्या म्हणण्याप्रमाणे, मी सायमंड्सला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही.
त्याचप्रमाणे, स्थानिक पोलिसांनी देखील सांगितलं की, आपात्कालीन आरोग्य सुविधांच्या माध्यामातून सायमंड्सचा जीव वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला होता.
वायलन टाऊनसन यांनी स्थानिक ऑस्ट्रेलिया मीडियाशी बोलताना सांगितलं की, मी सायमंड्सची नाडी तपासली होती, त्यानंतर मी त्याला सीपीआर देण्याचाही प्रयत्न केला. मात्र सायमंड्सच्या बाजूने कोणताही प्रतिसाद येत नव्हता. तो तिथेच अडकला होता, त्यामुळे मी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
अँड्र्यू सायमंड्सचं कार अपघातात निधन झालं. शनिवारी रात्री उशिरा कार अपघात झाला. यामध्ये गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांच्या टीमला त्याचे प्राण वाचवण्यात यश मिळालं नाही. त्याच्या निधनानं क्रीडा विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.