Ajinkya Rahane: टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि टेस्टचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे सध्या इंटरनॅशनलमधून बाहेर आहे. गेल्या वर्षभरापासून तो टीम इंडियासाठी खेळलेला नाही. गेल्या वर्षी वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर त्याला उप-कर्णधार बनवण्यात आलं होतं. या सिरीजमध्ये अजिंक्यला साजेसा खेळ करता आला नाही. त्यामुळे त्याला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. अशातच आता अजिंक्यने एक मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच रहाणे विदेशी टीमकडून खेळताना दिसणार आहे.
लीसेस्टरशायर संघाने काउंटी चॅम्पियनशिप आणि वनडे कपसाठी दुसऱ्या भागासाठी अजिंक्य रहाणेचा टीममध्ये समावेश केला आहे. अजिंक्य रहाणे लीसेस्टरशायरसाठी 5 काउंटी चॅम्पियनशिप सामने आणि संपूर्ण वनडे कप स्पर्धा खेळणार आहे. रहाणे गेल्या उन्हाळ्यांच्या दिवसांमध्ये लीसेस्टरशायरमध्ये रुजू होणार होता. मात्र यावेळी मात्र रहाणेने काही दिवस क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.
अजिंक्य रहाणेने 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. यावेळी रहाणेने भारताकडून आतापर्यंत 195 सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. या कालावधीत त्याने 8,000 हून अधिक रन्स केले आहेत. यामध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये 38.46 च्या सरासरीने 5,077 रन्स आणि वनडे सामन्यांमध्ये 35.26 च्या सरासरीने 2,962 रन्सचा समावेश आहे. त्याने T20I सामन्यात 375 रन्स केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एकूण 15 शतकं आहेत.
अजिंक्य रहाणे म्हणाला की, लीसेस्टरशायरला येण्याची आणखी एक संधी मिळाल्याने मी खूप उत्साहित आहे. मी क्लॉड हेंडरसन आणि अल्फोन्सो थॉमस यांच्याशी मजबूत संबंध निर्माण केला आहे. मी या क्लबसाठी खेळण्यास उत्सुक आहे. मी गेल्या वर्षी टीमच्या सर्व कामगिरीवर लक्ष ठेवलं होतं. या ठिकाणी मी माझ्या क्रिकेटचा आनंद लुटू शकेन. तसंच सिझनमध्ये क्लबसाठी अधिक यश मिळवेन अशी आशा आहे.