AUS vs NED : ग्लेन मॅक्सवेल याने रचला इतिहास! ठोकलं वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात जलद शतक

Fastest Century in World Cup : ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड (AUS vs NED) यांच्यात खेळवल्या गेलेल्या सामन्यात स्टार ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने वादळी शतक ठोकलं. मॅक्सवेलने वर्ल्ड कपमध्ये 40 बॉलमध्ये शतक पूर्ण करत इतिहास रचला आहे.

सौरभ तळेकर | Updated: Oct 25, 2023, 06:26 PM IST
AUS vs NED : ग्लेन मॅक्सवेल याने रचला इतिहास! ठोकलं वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात जलद शतक title=
AUS vs NED, Glenn Maxwell

Australia vs Netherlands : राजधानी दिल्लीच्या अरूण जेठली स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड (AUS vs NED) यांच्यात वर्ल्ड कपमधील 24 वा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा विस्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर (David Warner) याने चमकदार कामगिरी करत शतक झळकावलं. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा तडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात जलद शतक ठोकलं आहे. मॅक्सवेलने 40 बॉलमध्ये वादळी शतक झळकावलं. यामध्ये त्याने 9 फोर तर 6 सिक्स देखील खेचले आहेत. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाने 399 धावांचा डोंगर उभारला अन् नेदरलँडसमोर 400 धावांचं आव्हान दिलंय.

मार्करमचा रेकॉर्ड मोडला

दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्कराम याने 49 बॉलमध्ये आयसीसी क्रिकेट विश्वचषकमधील सर्वात जलद शतक झळकावलं होतं. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मार्करमने ही कामगिरी केली होती. विषेश म्हणजे दिल्लीच्या मैदानातच मार्करमने शतक झळकावलं होतं. त्यानंतर आता याच मैदानात मॅक्सवेलने रेकॉर्ड मोडलाय. भारताकडून विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 52 बॉलमध्ये शतक झळकावलं होतं.

ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मार्शच्या रूपात ऑस्ट्रेलियाला 28 धावांवरच पहिला धक्का बसला. तिथून पुढं वॉर्नरने संघाचा डाव सावरत शतक साकारलं. त्याने 91 चेंडूत 104 धावांची खेळी करत शतक झळकावलं. वॉर्नरचं विश्वचषक इतिहासातील सहावं शतक ठरलंय. तर स्मिथ आणि लाबुशेनने देखील अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर मॅक्सवेलचं वादळ आलं अन् 40 बॉलमध्ये नेदरलँडचा कार्यक्रम केला. 

ऑस्ट्रेलिया संघ

डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (WK), ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, पॅट कमिन्स (C), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, अॅडम झाम्पा.

नेदरलँड

विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, स्कॉट एडवर्ड्स (C), सायब्रँड एंजेलब्रेक्ट, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन