ब्रेडा : हॉकीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं भारताचा पराभव केला आहे. ठरलेल्या वेळेमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये १-१ची बरोबरी झाली. त्यामुळे पेनल्टी शूट आऊट घेण्यात आला. पेनल्टी शूट आऊटमध्ये ऑस्ट्रेलियानं भारताचा ३-१नं पराभव केला. ऑस्ट्रेलियानं १५व्या वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा मान पटकवला आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोवर्सनं मॅचचा पहिला गोल करून ऑस्ट्रेलियाला १-० ची आघाडी मिळवून दिली. यानंतर विवेक सादर प्रसादनं गोल करून मॅच बरोबरीमध्ये आणली.
यानंतर पेनल्टी शूट आऊटमध्ये सरदार सिंह, मनदीप सिंग आणि ललित उपाध्याय यांना पहिल्या ३ संधींमध्ये गोल करता आला नाही. पण मनप्रीत सिंहनं गोल केला. ऑस्ट्रेलियानं मात्र तोपर्यंत ३ गोल केले होते.
शनिवारीच भारतानं नेदरलँडविरुद्धची मॅच १-१नं बरोबरीत रोखत चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल गाठली होती. फायनलमध्ये मात्र भारतीय टीमला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.