मुंबई : इंग्लंड विरुद्ध वन डे सीरिजमधील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा 100 धावांनी पराभव झाला. आयपीएलपासून विराट कोहली खराब फॉर्ममध्ये खेळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोहलीची बॅट शांत आहे. त्याच्या बॅटमधून धावा निघत नसल्याने त्याला टीमबाहेर ठेवण्याची मागणी अनेकांनी केली.
गेल्या तीन वर्षांत कोहलीला क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावता आलं नाही. कोहलीला सपोर्ट करण्यासाठी रोहित शर्मापाठोपाठ आता पाकिस्तानचा दुसरा खेळाडूही या चर्चेत पडला आहे. फलंदाज बाबर आझमने विराट कोहलीचे समर्थन करत त्याच्यासाठी मोठी गोष्ट सांगितली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत विराट कोहलीला केवळ 16 धावा करता आल्या. पाकिस्तानचा धडाकेबाज फलंदाज आणि कर्णधार बाबर आझमने विराट कोहलीच्या समर्थनार्थ एक ट्विट केलं. आझमने गेल्या वर्षीच्या T20 वर्ल्ड कपमधील विराट कोहलीसोबतचा एक फोटो पोस्ट केला. त्याने इतकेच लिहिले की हेही दिवस निघून जातील, मजबूत रहा. बाबाझ आझमची गणना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते.
विराटपेक्षा वयाने आणि अनुभवाने लहान असलेले खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. त्यामुळे त्यांना संधी मिळत नसल्याने कोहलीला बाहेर ठेवण्याची मागणी होत आहे. तर कपिल देव यांनीही कोहलीच्या फ्लॉप शोनंतर त्याच्यावर टीका केली आहे.
विराट कोहलीने 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 12000 हून अधिक धावा केल्या आहेत. तो टी-20 क्रिकेटमध्येही मोठा मास्टर आहे. त्याने अनेक सामने जिंकवून दिले आहेत. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच घरच्या मैदानावरही अनेक रेकॉर्ड्स आहेत. अशा परिस्थितीत त्याचा अनुभव टीमसाठी फायद्याचा ठरू शकतो.
निवड समितीने विराट कोहलीला वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती दिली आहे. श्रीलंकेत होणाऱ्या आशिया कपमध्ये तो सहभागी होण्याची शक्यता आहे. टी 20 वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान शेवटचा सामना झाला होता. यामध्ये पाकिस्ताननं 10 विकेट्सने भारताचा पराभव केला.
विराट कोहलीच्या नावावर 70 शतके आहेत. तो दीर्घकाळ भारताच्या फलंदाजीचा कणा राहिला. जेव्हा तो क्रिझवर पाऊल ठेवायचा तेव्हा अनेक गोलंदाज त्याच्यासमोर घाबरायचे त्यांना घाम फुटायचाय. आता मात्र कोहलीची बॅट कधी चालणार याची अनेकांना प्रतिक्षा आहे. एशियन कपमध्ये कोहलीचा जलवा पाहायला मिळणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.