'भारतीय संघाच्या भल्यासाठी....', विराट कोहली, रोहित शर्माच्या भविष्याचा निर्णय ठरला? BCCI ने केलं स्पष्ट, 'जर दोघं...'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी रणजी ट्रॉफीत ग्रुप स्टेजमध्ये आपल्या संघांकडून प्रत्येकी एक सामना खेळला.   

शिवराज यादव | Updated: Feb 6, 2025, 01:45 PM IST
'भारतीय संघाच्या भल्यासाठी....', विराट कोहली, रोहित शर्माच्या भविष्याचा निर्णय ठरला? BCCI ने केलं स्पष्ट, 'जर दोघं...' title=

भारतीय क्रिकेटसाठी पुढील एक महिना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. रिपोर्टनुसार, या काळात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार खेळाडू विराट कोहली यांच्या आंतरराष्ट्रीय करिअरसंबंधी निर्णय घेतला जाणार आहे. भारतीय संघ सध्या इंग्लंडविरोधात तीन दिवसांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. यामधील पहिला सामना आज खेळला जाणार आहे. यानंतर 19 फेब्रुवारीपासून चॅम्पिअन्स ट्रॉफीला सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलियामधील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये रोहित आणि विराट अपयशी ठरल्यापासून त्यांच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे. रोहित शर्माने तीन सामन्यात फक्त 31 तर दुसरीकडे विराट कोहलीने 9 डावांमध्ये फक्त 190 धावा केल्या. रोहित शर्मा कौटुंबिक कारणास्तव पहिला कसोटी सामना खेळला नव्हता. 

दैनिक जागरणच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचा प्रमुख अजित आगरकर यांना भारतीय संघाच्या भल्यासाठी हवा तो निर्णय घेण्याची मोकळीक देण्यात आली आहे. सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, "आता वेळ फार पुढे आली आहे. तुम्ही बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील त्यांचा परफॉर्मन्स पाहिला का? त्यांची रणजी ट्रॉफीमधील कामगिरी पाहिली का? पुढील दोन मालिका फार महत्त्वाच्या असणार आहेत".

विराट कोहलीवरही सध्या फार दबाव आहे. पुढील एक महिन्यात चॅम्पिअन्स ट्रॉफी होणार असून, यावेळी त्याचीही परीक्षा होणार आहे. विराट कोहलीच्या कसोटीमधील भवितव्याबाबत चर्चा सुरु आहेत. जर रोहितप्रमाणे तोदेखील आपली कामगिरी उंचावू शकला नाही तर गौतम गंभीर आणि अजित आगरकरच्या नेतृत्वातील निवड समितीला मोठा निर्णय घ्यावा लागेल. 

याचा अर्थ आयपीएलनंतर होणाऱ्या इंग्लंडमधील कसोटी मालिकेसाठी विराट कोहलीची विचार केला जाणार नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी रणजी ट्रॉफीत ग्रुप स्टेजमध्ये आपल्या संघांकडून प्रत्येकी एक सामना खेळला. 

जम्मू आणि काश्मीरविरुद्ध मुंबईच्या धक्कादायक पराभवादरम्यान रोहितने 3 आणि 28 धावा केल्या, तर दिल्लीच्या रेल्वेविरुद्धच्या मोठ्या विजयादरम्यान कोहलीने फक्त एकदाच फलंदाजी केली. रेल्वेचा वेगवान गोलंदाज हिमांशू सांगवानने कोहलीला सहा धावांवर क्लीन बोल्ड केले. जर रोहित आणि कोहली इंग्लंडला गेले नाहीत, तर भारत नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली कसोटी मालिका खेळेल. जसप्रीत बुमराह हा आघाडीचा उमेदवार आहे, परंतु त्याची तंदुरुस्ती महत्त्वाची असेल.