Dwarkanath Sanzgiri Death: 'वजन कमी झाल्याने माझे...'; संझगिरींनी स्वत:च्या आजारपणाबद्दल लिहिलेली पोस्ट

Dwarkanath Sanzgiri Illness: ज्येष्ठ क्रिकेट समिक्षक द्वारकानाथ संझगिरी यांनी 50 वर्षांहून अधिक काळापासून लेखक म्हणून वाचकांच्या मनावर राज्य केलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 6, 2025, 01:21 PM IST
Dwarkanath Sanzgiri Death: 'वजन कमी झाल्याने माझे...'; संझगिरींनी स्वत:च्या आजारपणाबद्दल लिहिलेली पोस्ट title=
काही आठवड्यांपूर्वीच त्यांनी दिलेली ही माहिती

Dwarkanath Sanzgiri Illness: प्रसिद्ध लेखक तसेच ज्येष्ठ क्रिकेट समिक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं वयाच्या 74 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांनी मुंबईतील लिलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. प्रदिर्घ आजारानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1950 रोजी झाला होता. स्तंभलेखक, लेखक, दूरदर्शन प्रस्तुतकर्ता आणि संगीत कार्यक्रमाचे सादरकर्ते म्हणून संझगिरी यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र द्वारकानाथ संझगिरींना नेमकं काय झालं होतं याबद्दल त्यांनीच काही आठवड्यांपूर्वी एका पोस्टमध्ये माहिती दिली होती. या पोस्टमधून त्यांनी आपल्याला एका मदतनिसाची गरज असल्याचं म्हटलं होतं.

काय होतं त्या पोस्टमध्ये?

"मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की गेल्या पंधरा दिवसात माझ्या हातून लिखाण झालं नाही. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे वजन कमी झाल्याने माझे स्नायूसुद्धा कमी झाले आणि एका जागी एका पोझीशनमधे बसणं कठीण जातं. त्यामुळे तीन गोष्टी झाल्यात एकाग्रता कमी झाली आहे, वाचन आणि लिखाण कमी झालं आहे," असं द्वारकानाथ संझगिरींनी पोस्टमध्ये म्हटलं होतं. तसेच पुढे लिहिताना त्यांनी आपल्याला अशा अवस्थेत लिखानासाठी मदत हवी असल्याचं म्हटलं होतं.

"यातल्या शेवटच्या दोन गोष्टी माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या. मग करायचं काय? मला एक मुलगा किंवा मुलगी हवी जे रोज नाहीतरी अधूनमधून माझ्या आणि त्यांच्या सोईनुसार माझ्याकडे येऊ शकतील आणि मला इंग्लिश, मराठी वाचून दाखवू शकेल. मी जो सांगीन तो लेख उतरवू शकेल. काम साधारण असं असेल कि एक पुस्तक वाचून दाखवणं, इंटरनेटवरून मला हवी ती माहीती काढून देणं आणि टाईप करणं. लेख, पोस्ट किंवा फोटो सोशल मिडीयावर टाकणं वगैरे वगैरे. त्याकरता त्याचा स्वतःचा लॅपटॉप असणं जरूरी आहे. या कामाचा मोबदला एकमेकांशी चर्चा करून ठरवला जाईल. माझ्याकडे येणारा माणूस त्याचा नोकरी,धंदा सांभाळून हे काम करू शकतो. तुमच्यापैकी कुणी किंवा तुमच्या ओळखीतला कुणी इच्छुक असेल तर त्याने खाली दिलेल्या नंबरवर आपली माहीती व्हाॅटसअॅपवर पाठवून द्यावी. फार मोठी माहीती नकोय. त्या व्यक्तीचं नाव, पत्ता त्याचं शिक्षण, त्याच्या लेखनातल्या आवडीनिवडी आणि लॅपटॉप आहे कि नाही ते कळवावे. अशी कुणी व्यक्ती जर मला मिळाली तर मला मोलाची मदत होईल. तोपर्यंत मोठ्या लेखांच्या बाबतीत मी विश्रांती घेतोय. त्याला इंग्लिशमधे फार सुंदर शब्द आहे. Sabbatical. मला पुन्हा जोमाने लिहायचंय," असं म्हणत पोस्टची शेवट केली होती.

वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखनाव्यतिरिक्त, संझगिरी यांनी प्रवास, सामाजिक समस्या, क्रीडा आणि चित्रपट अशा विविध विषयांवर 40 पुस्तके लिहिली आहेत.