BCCI Team India For World Cup 2023: विश्वचषक 2023 स्पर्धा जसजशी जवळ येत आहे त्याप्रमाणे संघातील संभाव्य खेळाडूंसंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ नवीन सूचना जारी करत आहेत. या सूचना प्रशिक्षणासंदर्भातील आहेत. खेळाडूंच्या तयारीसंदर्भात कोणतीही कसर बीसीसीआयकडून राहू नये याची संपूर्ण काळजी नियोजनादरम्यान घेतली जात आहे. बोर्डाबरोबरच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचं एकच लक्ष आहे की मालिका सुरु होण्याआधी खेळाडू पूर्णपणे ठणठणीत असावेत. पुढील काही काळासाठी खेळाडूंकडून काय अपेक्षित आहे आणि काय नाही याबद्दलची सविस्तर माहिती बीसीसीआयने खेळाडूंना कळवली आहे. रिपोर्टनुसार आयर्लंडविरुद्ध खेळवण्यात आलेल्या मालिकेचा भाग नसलेल्या आणि आशिया चषक संघामधील खेळाडूंना 13 दिवसांचा फिटनेस प्रोग्राम दिला आहे.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने तयार केलेल्या या शेड्यूलनुसार या खेळाडूंना वेस्ट इंडिजवरुन आल्यानंतर नेमकं काय करायचं आहे याची माहिती दिली आहे. या नव्या नियमानुसार खेळाडूंनी सांगितलेल्या प्रमाणात प्रोटीनचं सेवन करावं, नियमितपणे जिमला जावं, वॉकला जावं आणि धावावं असं सांगण्यात आळं आहे. तसेच स्विमिंगलाही जाण्याचा सल्ला खेळाडूंना देण्यात आला आहे. यानंतर योग सेशन आणि नंतर मसाज घ्यावा असं सांगण्यात आलं आहे. गोलंदाज आणि फलंदाजांना वेगवेगळे व्यायाम करण्यास सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या नियमांमध्ये खेळाडूंना किती वेळ झोप काढावी याची माहितीही देण्यात आली आहे.
खेळाडूंनी किमान 9 तास झोपावं असंही बीसीसीआय आणि एनसीएने खेळाडूंसाठी जारी केलेल्या शेड्यूलमध्ये म्हटलं आहे. मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी किमान 9 तास झोप आवश्यक असते. त्यानुसारच हा सल्ला देण्यात आला आहे. तसेच प्रमुख खेळाडू असलेल्या रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शामी आणि मोहम्मद सिराज यांची बॉडी टेस्ट घेतली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. बंगळुरुमध्ये आशिया चषक स्पर्धेआधी आयोजित केल्या जाणाऱ्या 6 दिवसांच्या सराव शिबिरामध्ये ही बॉडी टेस्ट केली जाईल ज्यामध्ये रक्ताच्या चाचणीचाही समावेश आहे. 25 ऑगस्टपासून हे शिबिर सुरु झालं आहे. या शिबिरामध्ये ट्रेनर्स खेळाडूंची फिटनेस टेस्ट घेणार आहेत. तसेच या चाचण्यांमध्ये समाधानकारक कामगिरी न करणाऱ्या खेळाडूंच्या अडचणी वाढतील असंही सांगितलं जात आहे.
एका वृत्तपत्राने बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, खेळाडूंसाठी हा विशेष कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे पुढील 2 महिने तरी खेळाडूंनी ठणठणीत राहणं आवश्यक आहे. बॉडी टेस्टदरम्यान कोणी दिलेल्या नियमांचं पालन केलं आणि कोणी नाही हे सुद्धा समजणार आहे. नियम न पाळणाऱ्यांचं काय करायचं याचा निर्णय संघ व्यवस्थापन घेईल. विश्वचषक स्पर्धेसाठी अंतिम 15 खेळाडू निवडण्यापूर्वी सर्व खेळाडूंचा फिटनेस रिपोर्ट निवड समितीला आणि संघ व्यवस्थापनाला पाठवला जाणार आहे. त्यामुळेच आशिया चषकाबरोबरच ही नवी नियमावली वर्ल्डकपसाठीही महत्त्वाची आहे.