लंडन : ऍशेसआधी इंग्लंडला मोठा धक्का लागला आहे. इंग्लंडचा प्रमुख बॉलर जेम्स अंडरसनला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे एंडरनसनला आयर्रलंड विरुद्ध होणाऱ्या एकमेव टेस्टला मुकावे लागणार आहे. काउंटी चॅम्पियनशिप दरम्यान लॅन्कशायरविरुद्ध खेळताना अंडरसनला ही दुखापत झाली. या दुखापतीनंतर अंडरसन सोमवार आणि मंगळवारी झालेल्या सरावाला देखील उपस्थित नव्हता. अंडरसनची दुखापत पाहता कोणताही धोका न पत्करण्याचा निर्णय इंग्लंड टीम प्रशासनाने घेतला आहे.
जेम्स अंडरसनला झालेल्या दुखापत किती गंभीर आहे, याबद्दल माहिती मिळाली नाही. पण ऍशेस सीरिजच्या पहिल्या टेस्टमध्ये तो खेळणार की नाही, याबद्दल अनिश्चितता आहे. ऍशेस सीरिजच्या तोंडावर एंडरसन तंदुरस्त नसणे, हे इंग्लंडसाठी दुर्देवी आहे. दरम्यान ऍशेसच्या पहिल्या टेस्टआधी आपण फिट होऊ असा विश्वास अंडरसनने व्यक्त केला आहे. १ ऑगस्टपासून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या ऐतिहासिक ऍशेस टेस्ट सीरिजला सुरुवात होणार आहे.
जेम्स अंडरसन हा सध्या आयसीसी टेस्ट क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स पहिल्या क्रमांकावर आहे. ऍशेस सीरिजदरम्यान अंडरसनला पहिला क्रमांक गाठण्याची संधी आहे.
५७५ विकेटसह टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलरच्या यादीत अंडरसन चौथ्या क्रमांकावर आहे. मुथय्या मुरलीधरन (८०० विकेट), शेन वॉर्न (७०८ विकेट), अनिल कुंबळे (६१९ विकेट) हेच अंडरसनच्या पुढे आहेत. पण अंडरसन टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा फास्ट बॉलर आहे.