Team India: ऑस्ट्रेलियानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरूद्ध आमने सामने येणार आहे. यासाठी गुरुवारी बीसीसीआयने संध्याकाळी आफ्रिका दौऱ्यासाठी तिन्ही फॉर्मेटच्या सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. यामध्ये टी-20 च्या टीममध्ये जास्त बदल पहायला मिळाले नाहीत. मात्र वनडे आणि टेस्ट टीममध्ये मोठे बदल करण्यात आले असून वरीष्ठ खेळाडूंना टीममधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
शुक्रवारी टेस्ट टीमची घोषणा करण्यात आली आणि यामध्ये अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दोघांना टीममधून बाहेर काढण्यात आलं आहे. अशातच आता प्रश्न असा उपस्थित होतोय की, या दोन्ही खेळाडूंची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली आहे का?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सिरीज 10 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. टी-20 आणि वनडेनंतर सिरीजनंतर टीम इंडियाला २६ डिसेंबरपासून टेस्ट सिरीज खेळायची आहे. यावेळी टेस्ट टीमच्या नेतृत्वाची धुरा रोहित शर्माकडे असणार आहे. यावेळी टीमची घोषणा केल्यानंतर टीममधून दोन नावे गायब आहेत ती म्हणजे चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे. या दोघांसह गोलंदाज उमेश यादवला देखील संधी देण्यात आलेली नाही.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये 89 रन्सची इनिंग खेळणारा अजिंक्य रहाणे आणि अनुभवी चेतेश्वर पुजारा यांच्या कारकिर्दीतीला ब्रेक लागला असल्याचं मानलं जातंय. अजिंक्य रहाणेचा जूनमध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यामध्ये समावेश करण्यात आला होता. या सामन्यात अजिंक्य रहाणेने चांगला खेळही दाखवला होता. मात्र तरीही आता दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये रहाणेला डच्चू देण्यात आला आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्या दोन्ही जागा आता केएल राहुल आणि श्रेयस अय्यरकडे जाणार आहे. तसंच शुभमन गिल मधल्या फळीत फलंदाजी करेल. युवा यशस्वी जयस्वालला अधिक संधी दिली जाणार आहे.'
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर) , रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी आणि प्रसिध कृष्णा.