मुंबई : थॉमस कपमधील भारताच्या ऐतिहासिक विजयाची चर्चा होत असतानाच, ब्राझीलमधील 24 व्या डेफ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या एका 18 वर्षीय बॅडमिंटनपटूने 3 सुवर्णपदकांची कमाई केलीय. जर्लिन अनिका असे या खेळाडूचे नाव असून तिला ना ऐकू येत, ना तिला बोलता येत नाही. या स्थितीत तिने जी कामगिरी केली आहे ती वाखाण्याजोगी. भारताचे नाव उंचावणाऱ्या या खेळाडूची चर्चा आता सर्वत्र रंगलीय.
मुळची मदुराईची असलेल्या 18 वर्षीय जर्लिन अनिकासाठी ही कामगिरी सोप्पी नव्हती.यासाठी तिला खूप मेहनत घ्यावी लागली. डेफ ऑलिम्पिकमध्ये अनिकाने महिला एकेरी, मिश्र दुहेरी आणि मिश्र सांघिकमध्ये सुवर्ण यश संपादन केले. तिची ही कामगिरी धनधाकड खेळाडूंना लाजवेल अशीच आहे.
अनिकाचे वडील मात्र निराश
अनिकाचे वडील जय जैर रेचगेन यांनी पीटीआयला सांगितले की, ती महिला दुहेरीतही सुवर्णपदक जिंकू शकली असती, पण न जिंकल्याबद्दल मला खेद वाटतो, असे त्यांनी म्हटले. तसेच मुलीच्या कामगिरीनंतर अनेक नागरीक त्यांचे कौतूक करत होते. यावर त्यांनी एकाला विचारले की लोक माझे अभिनंदन का करताय. आम्ही सर्व 4 सुवर्ण जिंकू शकलो नाही, असे त्यांनी म्हटले.
खडतर प्रवास
निकासाठी हा प्रवास अजिबात सोप्पा नव्हता. तिला तिचे शब्द ऐकू येत नाहीत हे लक्षात आल्यानंतर तिच्या वडिलांनी ती एका सामान्य मुलीसारखे संगोपण करण्याचा निर्णय घेतला. मात्र बॅडमिंटनमधील तिची आवड पाहून वडिलांनी तिला स्थानिक क्लबमध्ये घेऊन गेले. जिथे ती तिच्या मैत्रिणींसोबत खेळू लागली. इथून खऱ्या अर्थाने तिच्या बॅडमिंटनमधील खेळातील प्रवासाला सुरुवात झाली.
अनिकाच्या वडिलांनी सांगितले की, तिने वयाच्या ८ व्या वर्षी मदुराई येथील बोस अकादमीमध्ये प्रशिक्षक पी सरवणन यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास सुरुवात केली. तसेच अनिकाच्या वडिलांना मदुराई जिल्हा प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने कर्णबधिरांसाठीच्या ऑलिम्पिकची माहिती दिली आणि तिथून तिचा सुवर्ण प्रवास सुरू झाला.
अनिकाने तुर्कीमध्ये 2017 च्या डेफ ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता.यानंतर तिने मलेशियामध्ये 2018 एशिया पॅसिफिक बॅडमिंटनमध्ये दोन रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकले. एका वर्षानंतर, तिने चीनमधील मूकबधिरांच्या जागतिक स्पर्धेत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकले होते.