Sarfaraz Khan Viral Video: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघात (Team India) सरफराज खानची (Sarfaraz Khan) निवड करण्यात न आल्याने सध्या भारतीय क्रीडा वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. सरफराज खानचा फिटनेस (Fitness) आणि त्याची वर्तणूक यामुळे त्याची निवड करण्यात आली नसल्याचं बोललं जात आहे. पण रणजी स्पर्धेत (Ranji Trophy) गेल्या तीन हंगामात सरफराज दमदार कामगिरी करत आहे. यानंतरही त्याच्याकडे बीसीसीआय (BCCI) सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचं काही दिग्गज खेळाडूंचं म्हणणं आहे. अशात सरफराजचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओ सरफराजची वर्तणूक आक्षेपार्ह असल्याचं बीसीसीआयचं म्हणणं आहे.
काय आहे व्हायरल व्हिडिओ?
वास्तविक गेल्या रणजी हंगामात सरफराजने दिल्लीविरुद्ध (Delhi) शतक ठोकल्यानंतर ड्रेसिंग रुमच्या दिशेने बोट दाखवलं होतं. यावेळी स्टेडिअममध्ये उपस्थित असलेल्या निवडकर्त्यांना हा इशारा दिला गेला असल्याचं मानलं गेलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सरफराजची आक्षेपार्ह वर्तणूक?
रणजी ट्रॉफी स्पर्धेत दिल्लीविरुद्धच्या सामन्यात सरफराजने शानदार सेंच्युरी ठोकली. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअममध्ये (Arun Jetli Stadium) सुरु होता. विशेष म्हणजे हा सामना पाहण्यासाठी भारतीय निवड समितीचे सदस्य सलिल अंकोला (Salil Ankola) उपस्थित होते. सरफारजने त्यांच्या दिशेने बोट दाखवत शतकाचा जल्लोष केला. सरफराजचं हे वागणं बीसीसीआयला खटकलं. त्यामुळेच सरफराजची टीम इंडियात निवड करण्यात आली नसल्याचं बोललं जात आहे.
Sarfaraz Khan's aggressive celebration of pointing towards selector Chetan Sharma who was watching the Ranji match from stands didn't go down well. #SarfarazKhan #BCCI pic.twitter.com/qIZqgAEIi7
— Cricket Videos (@Abdullah__Neaz) June 25, 2023
सरफराजच्या बचावासाठी मुंबई संथ
सरफराजला आपल्या फिटनेसवर लक्ष देण्याबरोबरच वर्तणुकीत सुधारणा करण्याची गरज असल्याचं बीसीसीआयकडून सांगितलं आहे. दुसरीकडे रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईसाठी मधल्या फळीत खेळणाऱ्या या फलंदाजासाठी मुंबई क्रिकेट संघ पुढे सरसावला आहे. दिल्लीत सरफारजने केलेला जल्लोष हा संघातील खेळाडू आणि प्रशिक्षक अमोल मुझूमदारसाठी होता, असं मुंबई क्रिकेट संघाने म्हटलंय. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात सरफराजने मुंबई संघाला अत्यंत कठिण परिस्थितीतून बाहेर काढलं, त्यामुळेच त्याने जल्लोष केला असं मुंबई संघाने स्पष्ट केलं.
मध्य प्रदेशच्या प्रशिक्षकाबरोबर वाद?
मध्य प्रदेशचे तत्कालीन प्रशिक्षक चंद्रकांत पंडित हे ही सरफराज खानवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. पण वास्तविक चंद्रकांत पाटील हे सरफारजला लहानपणापासून ओळखतात. त्यामुळे अफवा पसरवली गेल्याचं बोललं जात आहे.
यो-यो टेस्टही पास
भारतीय संघात निवड होण्यासाठी करावी लागणारी यो-यो टेस्टही सरफराजने पार केली आहे. इतकंच नाही तर त्याने अनेकवेळा सलग दोन दिवस फलंदाजी केली आहे.