Ravindra Jadeja Century, IND vs ENG Test: राजकोट कसोटीचा पहिला दिवस कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि अष्टपैली रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) गाजवला. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत रोहित शर्माने टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताची सुरुवात खराब झाली. सलामीला आलेला यशस्वी जयस्वाल, तिसऱ्या क्रमांकावरच शुभमन गिल आणि रजत पाटीदार झटपट आऊट झाले. अवघ्या 33 धावात टीम इंडियाने तीन विकेट गमावले. पण यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजाने सूत्र आपल्या हातात घेतली. या दोघांनी सुरुवातीला सावध नंतर आक्रमक फलंदाजी करत धावसंख्या वाढवली. चौथ्या विकेटसाठी या दोघांनी तब्बल 204 धावांची भागिदारी केली.
रवींद्र जेडजाचं शानदार शतक
कर्णधार रोहित शर्माने शानदर शतक झळकावलं. कसोटी कारकिर्दीतलं त्याचं हे 11 वं शतक ठरलं. रोहित शर्मा 131 धावांवर बाद झाला. पण त्यानंतर जडेजाने खिंड लढवली. कसोटी पदार्पण करणाऱ्या सर्फराज खानच्या साथीने जडेजाने स्कोअरबोर्ड हलता ठेवला. रवींद्र जडेजाने 198 चेंडूत शतक ठोकलं (Ravindra Jadeja Century). कसोटी कारकिर्दीतलं जडेजाचं हे चौथं शतक ठरलं आहे. राजकोटच्या मैदानावर जडेजाचं हे सलग दुसरं शतक ठरलं आहे. शतक ठोकल्यानंतर रवींद्र जडेजाने आपल्या खास अंदाजात बॅट हवेत फिरवत तलवाराबाजी केली.
राजकोटच्या मैदानावर दुसरं शतक
राजकोटचं सौराष्ट्र क्रिकेट स्टेडिअम हे रवींद्र जडेजाचं होमग्राऊंड आहे. या मैदानावर हा त्याचा तिसरा कसोटी सामना आहे. 2016 मध्ये जडेजा याच मैदानावर इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात जडेजाने 12 आणि नाबाद 32 धावा केल्या. त्यानंतर राजकोटच्या मैदानावर दुसरा कसोटी सामना वेस्टइंडिजबरोबर खेळला. 2018 मध्ये हा सामना झाला. या सामन्याच्या पहिल्या डावात जडेजाने नाबाद 100 धावांची खेळी केली. आता तब्बल सहा वर्षांनी जडेजाने पुनहा एकदा याच मैदानावर शतक झळकावलं आहे.
रवींद्र जडेजा भारतासाठी आतापर्यंत 70 कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने 3003 धाव केल्या असून 175 हा त्याचा कसोटी कारकिर्दीतला सर्वोत्तम धावसंख्या आहे. जडेजाच्या नावार चार शतकं आणि 20 अर्धशतकं जमा आहेत. तर 70 कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाने तब्बल 280 विकेट घेतल्या आहेत. 110 धावात 10 विकेट ही त्याची कसोटी कारकिर्दीतली सर्वोत्तम गोलंदाजी आहे.
राजकोट कसोटीत भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल(विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
राजकोट कसोटीत इंग्लंडचा संघ
जॅक क्रॉउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स एंडरसन.