India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) लंडनच्या ओव्हर क्रिकेट मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC) अंतिम सामना रंगणार आहे. 7 ते 14 जून दरम्यान हा सामना खेळवला जाणार असून अंतिम सामन्यासाठी दोनही संघ सज्ज झाले आहेत. सामन्याच्या आधी खेळपट्टीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. खेळपट्टीवर काही प्रमाणात गवत आहे, त्यामुळे खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करणारी ठरू शकते. अशात टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये किती वेगवान गोलंदाज असणार, यावर कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मोठा खुलासा केला आहे.
पत्रकार परिषेदत खुलासा
सामन्याच्या एक दिवस आधी घेतलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाच्या कर्णधारांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना कर्णधार रोहित शर्माने संघ आणि खेळपट्टीबाबत खुलासा केला आहे. ओव्हल मैदानाची खेळपट्टी सारखी बदलत असते. सामन्याला अजून 48 तास आहेत. त्यामुळे उद्याची खेळपट्टी कशी असेल हे आताच सांगता येणार नाही, प्रत्यक्ष सामन्याच्या दिवशी खेळपट्टी पाहून अंदाज घेतला जाईल, त्यानंतरच अंतिम अकरा खेळाडूंबद्दल निर्णय घेतला जाईल असं कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केलं आहे. पण सर्व 15 खेळाडूंना सज्ज राहाण्यास सांगण्यात आल्याचंही रोहित शर्माने सांगितलं.
रोहित शर्माचं मोठं वक्तव्य
टीम इंडियाचं कर्णधारपद सोडण्याआधी एक-दोन मोठ्या स्पर्धा जिंकण्याची इच्छा रोहित शर्माने व्यक्त केली आहे. गेल्या दहा वर्षात अनेकवेळा संधी मिळूनही टीम इंडिया आयसीसीचं एकही जेतेपद मिळवू शकलेली नाही. कर्णधारपदी कोणीही असेल प्रत्येकाचं स्वप्न टीम इंडियाने जेतेपद पटकवावं असंच आहे. मी सुद्धा जिंकायचं आहे, चॅम्पियनशिप पटकावयची आहे असं रोहित शर्माने म्हटलंय.
अशी असेल टीम इंडिया
टीम इंडियाची सलामीची जबाबदारी कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यावर असेल. आयपीएलमध्ये शुभमन गिल जबरदस्त फॉर्मात होता. त्याने आयपीएलच्या सोळाव्या हंगामात तब्बल तीन सेंच्युरी झळकावल्यात. याच कामगिरीच्या जोरावर त्याला टीम इंडियात संधी देण्यात आली आहे. तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा आणि चौथ्या क्रमांकावर स्टार फलंदाज विराट कोहली येऊ शकतो.
मोठ्या काळानंतर संघात पुनरागमन केलेला अजिंक्य राहाणे पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरण्याची शक्यता आहे. तर विकेटकिपर म्हणून इशान किशनऐवजी केएस भरतला संधी मिळू शकते. फिरकीची जबाबदारी अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि अनुभवी आर अश्विनवर असेल. तर वेगवागन गोलंदाजीची मदार मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज सांभाळतील.