जोहान्सबर्ग : बांग्लादेशविरुद्धच्या दुसऱ्या टी-20मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरनं विश्वविक्रम केला आहे. टी-20 क्रिकेटमधलं सगळ्यात वेगवान शतक मिलरनं झळकावलं आहे. मिलरनं फक्त ३६ बॉल्समध्येच त्याचं शतक पूर्ण केलं. मिलरच्या या वादळी खेळीमध्ये ७ फोर आणि ९ सिक्सचा समावेश होता.
११ व्या ओव्हरमध्ये बॅटिंगला आलेल्या मिलरचा शून्य रनवर असताना रुबेल हुसेननं कॅच सोडला. पण यानंतर मात्र मिलरनं मागे पाहिलं नाही. १९ व्या ओव्हरच्या पहिल्या पाचही बॉलवर मिलरनं पाच सिक्स मारले तर सहाव्या बॉलवर एक रन काढून एका ओव्हरमध्ये ३१ रन्स फटकावले.
याआधी टी-20मध्ये सर्वात जलद शतक झळकवण्याचा पराक्रम आफ्रिकेच्याच रिचर्ड लेवीनं केला होता. २०१२ साली न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्ये लेव्हीनं ४५ बॉल्समध्ये शतक पूर्ण केलं होतं.