Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेचं यजमानपद भारताकडे असून एकूण 16 संघ या सहभागी झाले आहेत. स्पर्धेत एकूण 44 लढती होणार असून अंतिम सामना 29 जानेवारीला होणार आहे. हॉकी विश्वचषकाचं यजमानपद भारताला सलग दुसऱ्यांदा मिळालं आहे. हे सर्व सामने राउरकेला-भुवनेश्वर आणि ओडिशा येथे होणार आहेत. मात्र क्रिकेटवेड्या देशात राष्ट्रीय खेळाची स्थिती आणि खेळाडूंना मिळणारा मान पाहून दु:ख होतं. असं असलं तरी भारतीय हॉकी संघाने एक काळ गाजवला आहे. भारतीय हॉकीच्या सुवर्णकाळातील बऱ्याच गोष्टी आजही जुन्या जाणत्या लोकांच्या स्मरणात आहेत. पहिल्या वर्ल्डकप स्पर्धेच्या आयोजनाबाबत आजही एक किस्सा अनेकांच्या लक्षात आहे. 1971 साली हॉकी वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानला मिळालं होतं. या स्पर्धेचं आयोजन लाहोरमध्ये केलं होतं. मात्र एका घटनेमुळे या स्पर्धेचं आयोजन स्पेनमध्ये करण्यात आलं. यामुळे पाकिस्तानची संपूर्ण जगात नाचक्की झाली होती. पण नेमकं काय झालं होतं याबाबत तुम्हाला माहिती नसेल तर जाणून घ्या.
भारतीय हॉकी संघाचा माजी खेळाडू हरचरण सिंग यांनी भुतकाळातील आठवणींना उजाळा दिला. पहिलावहिला हॉकी वर्ल्डकपबाबत त्यांनी सांगितलं की, "पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री जुलफिकर अली भुट्टो यांच्या विधानामुळे तेव्हा वातावरण तापलं होतं. भुट्टो यांनी धमकी देत सांगितलं की, जर भारतीय संघ पाकिस्तानात खेळण्यास आला तर स्टेडियमधील संपूर्ण गवत जाळून टाकू. त्यामुळे आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशननं धसका घेतला आणि हॉकी वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन स्पेनमध्ये करण्याचं निश्चित केलं. ही स्पर्धा ठरलेल्या वेळेनुसार झाली नाही. यासाठी काही महिन्यांचा अवधी गेला आणि 1971 सालच्या शेवटी झाली. ही स्पर्धा स्पेनच्या बारसेलोना येथे झाली. " हरचरण सिंग 1971, 1973 आणि 1975 या हॉकी वर्ल्डकप संघातील महत्त्वाचे खेळाडू होते.
बातमी वाचा- Hockey World Cup 2023 : 16 संघ..44 लढती, 13 जानेवारीपासून सुरू होणार हॉकीचं महाकुंभ, पाहा संपूर्ण Schedule
1971 सालचा पहिला वर्ल्डकप पाकिस्ताननं जिंकला. भारताला उपांत्य फेरीत पराभवाची धूळ चारून अंतिम फेरी गाठली होती. आतापर्यंत पाकिस्ताननं एकूण 4 वर्ल्डकप जिंकले आहेत. भारताने हॉकी वर्ल्डकप इतिहासात फक्त एकदाच वर्ल्डकपवर नाव कोरलं आहे. मलेशियात 1975 साली आयोजित केलेला वर्ल्डकप अजितपाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला. या संघात दिग्गज खेळाडू हरचरण सिंग यांनी महत्त्वाची खेळी केली होती.