'शुबमन गिल ओव्हररेटेड खेळाडू,' भारताच्या दिग्गजाने स्पष्टच सांगितलं; निवड समितीला म्हणाले 'तुम्हाला...'

भारताच्या दिग्गज खेळाडूने निवड समितीवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. शुबमन गिलने ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेत 31, 28, 1, 10 आणि 13 धावा केल्या आहेत.   

शिवराज यादव | Updated: Jan 7, 2025, 05:13 PM IST
'शुबमन गिल ओव्हररेटेड खेळाडू,' भारताच्या दिग्गजाने स्पष्टच सांगितलं; निवड समितीला म्हणाले 'तुम्हाला...' title=

यशस्वी जैस्वाल वगळता कोणत्याही भारतीय फलंदाजाला ऑस्ट्रेलियात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक सातत्यांसह धावा करता आल्या नाहीत. नितीश कुमार रेड्डी, ऋषभ पंत आणि केएल राहुल यांनी अनेकदा आश्वासक कामगिरी केली, पण भारतीय संघाला गरज होती तेव्हा मात्र चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले. या मालिकेत सर्वांचं लक्ष विराट कोहली, रोहित शर्मा या दिग्गजांच्या कामगिरीकडे होतं. मात्र शुबमन गिलही ही मालिका लवकरात लवकर विसरण्याचा प्रयत्न करेल. भारतीय संघाचं भविष्य म्हणून शुबमन गिलकडे पाहिलं जातं. मात्र मागील अनेक काळापासून तो उत्कृष्ट कामगिरी करु शकलेला नाही. खासकरुन परदेशात त्याची कामगिरी छाप पाडणारी नाही. 

1983 वर्ल्डकप विजेत्या संघाचे खेळाडू आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज कृष्णमाचारी श्रीकांत यांनी शुबमन गिल हा फार ओव्हररेटेड खेळाडू असल्याचं म्हटलं आहे. तसंच शुबमन गिलपेक्षा चांगल्या आणि पात्र खेळाडूंकडे दुर्लक्ष केल्याने अजित आगरकरच्या नेतृत्वातील निवड समितीवर ताशेरे ओढले आहेत. 

"मला नेहमीच वाटतं की, शुबमन गिल हा ओव्हररेटेड क्रिकेटर आहे. पण कोणीही माझं ऐकत नाही. तो विनाकारण डोक्यावर चढवलेला खेळाडू आहे," असं श्रीकांत यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवर म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले की, "शुबमन गिलला इतकी संधी का मिळत आहे. काही लोकांचा आश्चर्य वाटत आहे की, सूर्यकुमार यादवसारख्या खेळाडूला कसोटीमध्ये इतकी संधी मिळेल का?".

श्रीकांत यांच्या मते आघाडीला खेळण्यासाठी सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन यांचा निवड समितीने विचार करायला हवा. शुबमन गिल चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत असताना हे तिन्ही खेळाडू स्थानिक क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करत आहेत. मात्र यानंतरही निवड समितीकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. 

"सूर्यकुमारची कसोटीत फारशी चांगली सुरुवात झाली नाही, पण त्याच्याकडे तंत्र आहे आणि क्षमता आहे. पण निवडकर्ते आणि व्यवस्थापनाने त्याला आता मर्यादित षटकांमधील तज्ञ म्हणून नियुक्त केलं आहे. याचा अर्थ तुम्हाला नवीन टॅलेंटकडे पाहावं लागेल," असं श्रीकांत यांनी सांगितलं. 

"उदाहरणार्थ, ऋतुराज गायकवाड प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी करत आहे. परंतु त्यांनी त्याला निवडण्याची तसदी घेतली नाही. दरम्यान, साई सुदर्शनासारखा कोणीतरी 'अ' दौऱ्यांमध्ये चांगली कामगिरी करत आहे. तुम्हाला या टॅलेंटना प्रोत्साहन द्यावे लागेल. त्याऐवजी, ते गिलला निवडून त्यात वर्तुळात धावत आहेत," असं त्यांनी ठामपणे सांगितलं.