मुंबई : पुढच्या वर्षीच्या आयपीएलसाठी टीमनी आत्तापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. मुंबईच्या टीमनं बंगळुरुच्या टीममधल्या दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकला टीममध्ये घेतलं आहे. तर हैदराबादच्या शिखर धवनलाही टीममध्ये घेण्याचा मुंबईचा प्रयत्न सुरु आहे. टीमनी खेळाडूंमध्ये बदल केल्यानंतर जानेवारीमध्ये नव्या खेळाडूंसाठी लिलाव होणार आहे. पण त्याआधीच भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंगनं भविष्यवाणी केली आहे. आयपीएलच्या लिलावामध्ये वेस्ट इंडिजचा शिमरोन हेटमेयर कोट्यधीश होईल, असं ट्विट हरभजननं केलं आहे.
भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये ५ व्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या शिमरोन हेटमेयरनं चौफेर फटकेबाजी करत शतक केलं. हेटमेयरनं ७८ बॉलमध्ये १०६ रन केले. यात ६ सिक्स आणि ६ फोरचा समावेश होता. १३व्या वनडेमधलं हेटमेयरचं हे तिसरं शतक होतं. ही तिन्ही शतकं १३५ च्या स्ट्राईक रेटनं केलेली आहेत.
पहिल्या वनडेमध्ये शानदार प्रदर्शन करणारा हेटमेयर टेस्ट सीरिजमध्ये मात्र अपयशी ठरला. टेस्ट सीरिजच्या ४ इनिंगमध्ये त्याला फक्त ५० रन करता आले. यानंतर त्यानं ब्रायन लाराची मदत घेतली आणि पहिल्याच वनडेमध्ये शतक केलं. क्रिकेट सुधारण्यासाठी मी सर विव रिचर्ड्स, लांस गिब्ज आणि ब्रायन लारा यांच्यासारख्या महान खेळाडूंशी बोलतो. त्यांनी मला नैसर्गिक खेळ करण्यास सांगितल्याचं हेटमेयर म्हणाला.