ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या कुटुंबांना धमकावणाऱ्या भारतीयांवर हरभजन संतापला, म्हणाला 'तुमच्या अशा वागण्याने...'

वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय चाहत्यांनाकडून ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या कुटुंबाला टार्गेट केलं जात आहे. काहींनी तर खेळाडूंच्या पत्नी, मुलीला बलात्काराची धमकी दिली आहे. यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने अशा चाहत्यांना झापलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 21, 2023, 04:01 PM IST
ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या कुटुंबांना धमकावणाऱ्या भारतीयांवर हरभजन संतापला, म्हणाला 'तुमच्या अशा वागण्याने...' title=

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये झालेल्या वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखत भारताचा पराभव केला आणि सहाव्यांदा वर्ल्डकप ट्रॉफीवर नाव कोरलं. भारताचा वर्ल्डकपमध्ये पराभव झाल्यानंतर काही क्रिकेट चाहते ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या कुटुंबाला टार्गेट करत आहेत. भारतीय क्रिकेट चाहते सोशल मीडियावरुन ऑस्ट्रेलियन खेळाडूंना ट्रोल करताना त्यांच्या कुटुंबालाही लक्ष्य करत आहेत. यावरुन भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग संतापला असून, अशा चाहत्यांना सुनावलं आहे. 

हरभजन सिंगने सोशल मीडियाच्या माध्यमातून इतकी चांगली वर्ल्डकप स्पर्धा झाल्यानंतर विवेक आणि प्रतिष्ठा जपणं जास्त महत्त्वाचं आहे असं सांगत ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबाला टार्गेट न करण्याचं आवाहन केलं आहे. 

हरभजन सिंग काय म्हणाला आहे?

"ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या कुटुंबीयांना ट्रोल केलं जात असल्याचं समोर येत असून हे फार वाईट आहे. आपण चांगले खेळलो, पण ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी फायनलमध्ये चांगली खेळी केल्याने आपण हारलो. इतकीच ही बाब आहे. खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियांना ट्रोल कशासाठी केलं जात आहे? तमाम क्रिकेट चाहत्यांना विनंती आहे त्यांनी हे वर्तन थांबवावं. विवेक आणि प्रतिष्ठा अधिक महत्त्वाची आहे,” असं हरभजन सिंगने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

वर्ल्डकप फायनलनंतर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलची पत्नी विनी रमनने सोशल मीडियावर अभिनंदनाची पोस्ट शेअर केली होती. यावेळी तिला अनेक द्वेषपूर्ण कमेंट आणि मेसेजचा सामना करावा लागला. विनी रमनने इंस्टाग्रामला पोस्ट शेअर करताना ऑस्ट्रेलियन संघाच्या विजयाचा प्रवास शेअर केला होता. पण तिच्या या पोस्टने ट्रोलर्सचं लक्ष वेधून घेतलं. तिला अनेकांनी तू भारतीय असून ऑस्ट्रेलियाला पाठिंबा देत आहेस असेही मेसेज केले. 

हे ट्रोलिंग फक्त विनी रमनपुरतं मर्यादित नव्हतं. भारताविरोधात शतक ठोकणाऱ्या ट्रॅव्हिस हेडच्या कुटुंबाला या द्वेषाला सामोरं जावं लागलं.

विनी रमनने ट्रोलर्सना उत्तर देताना चांगला दृष्टीकोन ठेवा असं आवाहन केलं. तिने लोकांना क्रिकेटच्या खेळावरुन द्वेष पसरवण्याऐवजी अधिक महत्त्वाच्या जागतिक समस्यांवर आपली ऊर्जा केंद्रित करण्याचं आवाहन केलं.

ट्रॅव्हिस हेड ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक अंतिम विजयाचा नायक म्हणून उदयास आला. त्याने केवळ 120 चेंडूत 137 धावा फटकावल्या, ज्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला 241 धावांचा पाठलाग सहजपणे करता आला. ग्लेन मॅक्सवेलने संपूर्ण स्पर्धेत बॅट आणि बॉल दोन्हीसह अष्टपैलू कामगिरी केली. अफगाणिस्तानविरोधातील सामन्यात 201 च्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाची स्थिती 7 बाद 92 अशी होती. अफगाणिस्तानविरुद्धचे त्याचे द्विशतक हे एकदिवसीय सामन्यातील सर्वोत्तम खेळींपैकी एक मानले जात आहे.