सनथ जयसूर्यावर भ्रष्टाचाराचे आरोप

श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्यावर आयसीसीनं भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

Updated: Oct 15, 2018, 07:43 PM IST
सनथ जयसूर्यावर भ्रष्टाचाराचे आरोप title=

दुबई : श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्यावर आयसीसीनं भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. जयसूर्यानं भ्रष्टाचार विरोधी नियमांचं उल्लंघन केल्याचं आयसीसीचं म्हणणं आहे. या सगळ्याचं उत्तर द्यायला जयसूर्याला १५ ऑक्टोबरपासून १४ दिवसांची मुदत दिली आहे. जयसूर्यानं आयसीसीच्या दोन नियमांचं उल्लंघन केल्याचं आयसीसीनं सांगितलं.

जयसूर्यानं आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकला (एसीयू) चौकशीदरम्यान सहकार्य केलं नाही. तसंच एसीयूच्या चौकशीला अडथळा आणल्याचा आणि चौकशीला वेळ लावल्याचा आरोप जयसूर्यावर लावण्यात आले आहेत. आयसीसीनं याप्रकरणावर यापेक्षा जास्त माहिती दिलेली नाही.

अल-जजीरानं केलेल्या स्टिंग ऑपरेशनच्या आधारावर आयसीसीकडून ही कारवाई करण्यात येतेय. या स्टिंग ऑपरेशननुसार जुलै २०१७ साली झालेली भारत आणि श्रीलंकेमधली मॅच फिक्स होती. त्याआधी ऑगस्ट २०१६ साली झालेली श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाची मॅचही फिक्स असल्याचा दावा या स्टिंग ऑपरेशनमध्ये करण्यात आला होता.

सनथ जयसूर्यानं श्रीलंकेकडून १९८९-२०११ पर्यंत क्रिकेट खेळलं. २२ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत जयसूर्यानं ११० टेस्ट आणि ४४५ वनडे खेळल्या. जयसूर्या श्रीलंकेचा माजी खासदारही आहे. सनथ जयसूर्या हा श्रीलंकेच्या निवड समितीचा माजी अध्यक्षही होता.