ICC World Cup India vs Pakistan : जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलेल्या विश्वचषकातील हायव्होल्टेज सामन्याला आता केवळ एकदिवसाचा अवधी राहिला आहे. आयसीसी विश्वचषक स्पर्धेत 14 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्धांमध्ये सामना रंगणार आहे. संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष या सामन्याकडे लागलं आहे. भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामना म्हटलं की क्रिकेट चाहत्यांमध्ये हायटेन्शन असतं. तसंच दोन्ही संघांवरही जिंकण्याचं तितकंच दडपण असतं. विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत दोनही संघ प्रत्येकी दोन सामने जिंकलेत. त्यामुळे विजयाची हॅटट्रीक करण्यासाठी रोहितसेना आणि बाबरसेना सज्ज झालेत.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मावर (Rohit Sharma) जास्त दबाव असणार आहे, कारण विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध पहिल्या पराभवाचा ठपका पडू नये यासाठी रोहित शर्मा प्रयत्नशील असणार आहे. या सामन्यात रोहित शर्माबरोबर टीम इंडियाचा (Team India) आणखी एक खेळाडू भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे.
हा खेळाडू असणार सहकॅप्टन
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माबरोबर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सहकर्णधार असणार आहे. पांड्या प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्षपणे टीम इंडियाचे नेतृत्व करेल. याचा अर्थ रोहित अधिकृत कर्णधार राहील पण पंड्या मैदानावर प्रत्यक्ष कर्णधारी करताना दिसेल.
हार्दिक पांड्याचं होमग्राऊंड
भारत-पाकिस्तानदरम्याचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. मोदी स्टेडिअम हे हार्दिक पांड्याचं होम ग्राऊंड आहे. आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सचं नेतृत्व केलं होतं. गुजरात टायटन्सचे बरेचसे सामना नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये खेळवण्यात आले होते. यातले 90टक्के सामने गुजरात टायटन्स जिंकलेही होते. त्यामुळे नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळण्याचा हार्दिक पांड्याला चांगला अनुभव आहे. कोणत्या वेळी कोणाला गोलंदाजी द्यायची याची माहिती पांड्याला आहे. त्यामुळे पाकिस्तानविरद्धच्या रणनितीत हार्दिक पांड्याचा मोठा वाटा असेल.
नरेंद्र मोदी स्टेडिअमवर टॉसचा निर्णयही महत्त्वाचा ठरणार आहे, टॉससाठीदेखील हार्दिक पांड्याचा सल्ला महत्त्वाचा ठरणार आहे. त्याचबरोबर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना हार्दिक पांड्याला फलंदाजी आणि गोलंदाजीतही दमदार कामगिरी करावी लागणार आहे. अहमदाबादच्या मैदानावर धावा कशा करायच्या याचाही अनुभव हार्दिक पांड्याला आहे. त्याचबरोबर कोणत्या लाईन-लेंथवर गोलंदाजी करायची याबाबतही हार्दिक पांड्याचा सल्ला महत्त्वाचा ठरणर आहे.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकुर.
पाकिस्तान संघ
इमाम उल हक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन अफरीदी, हारिस रऊफ, मोहम्मद वसीम जूनियर, आगा सलमान, उसामा मीर, अब्दुल्ला शफीक