Virat Kohli: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने (Team India) सलग सहा सामने जिंकलेत आणि आता येत्या गुरुवारी म्हणजे 2 नोव्हेंबरला टीम इंडियाचा सातवा सामना श्रीलंकेविरुद्ध रंगणार आहे. तर 5 नोव्हेंबरला भारताचा आठवा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवला जाणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डनवर (Eden Gardens) खेळवला जाणार आहे. हा दिवस क्रिकेट चाहत्यांसाठी खास असणार आहे. कारण याच दिवशी म्हणजे 5 नोव्हेंबरला टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा (Virat Kohli) वाढदिवस आहे. विराट आपला 35 वाढदिवस साजरा करेल.
विराट कोहलीचा वाढदिवस यादगार करण्यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशनने जबरदस्त तयारी केली आहे. 70 हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या कोलकाताच्या ईडन गार्डनवर सर्व म्हणजे 70000 फॅन्सना विराट कोहलीचे मास्क वाटले जाणार आहेत. म्हणजे संपूर्ण स्टेडिअम विराटमय होणार असून एकाचवेळी स्टेडिअमवर 70 हजार विराट कोहली दिसणार आहेत. याशिवाय स्पेशल केक कापला जाणारआहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनने यासाठी जंगी तयारी केली आहे.
काय असणार खास?
विराट कोलीच्या बर्थ डे साठी ईडन गार्डन्स स्टेडिअमवर लेजर शोचं आयोजनही केलं जाणार आहे. त्याचबरोबर फटाक्यांची आतषबाजी करण्यात येईल. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया हा सामना जिंकत विराट कोहलीला विजयाची भेट देण्याचा प्रयत्न करेल. पॉईंटटेबलमध्ये भारतीय क्रिकेट संघ सहा विजयांसह पहिल्या स्थानावर आहे.
विराट कोहली जबरदस्त फॉर्मात
रविवारी इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात विराट कोहली शुन्यावर बाद झाला. पण गेल्या पाच सामन्यांमधली कामगिरी पाहिली तर विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पजतोय. विराट कोहलीने सहा सामन्यात 88.50 च्या अॅव्हरेजने 354 धावा केल्या आहेत. यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली सहाव्या स्थानावर आहे.
सेंच्युरीची हाफसेंच्युरी
विराट कोहली आंतररराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेंच्युरी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटच्या नावावर 48 सेंच्युरी जमा आहे. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर 49 सेंच्युरी जमा आहेत, म्हणजे विराट कोहली सचिनच्या सर्वाधिक सेंच्युरीच्या विक्रमापासून केवळ एक पाऊल दूर आहे. श्रीलंकेविरुद्ध 49 वी आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी विराटने सेंच्युरीची हाफसेंच्युरी करावी अशी आशा क्रिकेट चाहते बाळगून आहेत.