World Cup England vs New Zealand : वर्ल्डकप 2023 चा पहिला सामना अहदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यामध्ये गतविजेता इंग्लंडचा संघ आणि उपविजेता न्यूझीलंडचा संघ आमने-सामने होते. हा सामना तसा एकतर्फी राहिला. न्यूझीलंडने हा सामना 14 ओव्हर आणि 9 विकेट्स राखून जिंकला. न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हिड कॉन्वे आणि युवा फलंदाज रचिन रविंद्र यांनी दमदार खेळी करत 270 हून अधिक धावांची पार्टरनशीप करत सामना जिंकून दिला. या सामन्यामधील कामगिरी पाहिल्यानंतर जुन्या आकडेवारीच्या आधारे न्यूझीलंडच वर्ल्डकप जिंकणार असा दावा केला जात आहे.
वर्ल्डकपमधील पहिल्याच सामन्यामध्ये इंग्लंडने न्यूझीलंडला 283 धावांचं आव्हान दिलं होतं. पहिल्याच चेंडूवर न्यूझीलंडचा विल यंग बाद झाल्याने आता पुढील सामना अधिक रंजक होणार असं वाटतं होतं. मात्र डेव्हिड कॉन्वे आणि रचिन रविंद्र यांनी तब्बल 273 धावांची पार्टनरशीप करत 9 गडी आणि 13 ओव्हर 4 बॉल राखून सामना जिंकून दिला. डेव्हिड कॉन्वेने 121 बॉलमध्ये नाबाद 152 धावा केल्या. यात त्याने 19 चौकार आणि 3 षटकार लगावले. तर त्याला साथ देणाऱ्या आणि पहिलाच वर्ल्डकप खेळणाऱ्या रचिन रविंद्रनेही नाबाद शतक झळकावलं. त्याने 96 बॉलमध्ये 123 धावा केल्या यामध्ये 11 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. कॉन्वे हा 2023 च्या वर्ल्डकपमध्ये शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
कॉन्वे आणि रचिन रविंद्र या दोघांच्या कामगिरीची आकडेवारी पाहून न्यूझीलंडच यंदाचा वर्ल्डकप जिंकणार असलं म्हटलं जात आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे कॉन्वेने झळकावलेलं शतकं. वर्ल्डकपच्या मागील 4 पर्वांमध्ये ज्या संघाच्या फलंदाजाने वर्ल्डकप स्पर्धेतील पहिलं शतक झळकावलं त्या संघानेच जेतेपद पटकावलं आहे. अगदी सविस्तरपणे सांगायचं झाल्यास, 2007 साली ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉण्टींग हा स्पर्धेचा पहिला शतकवीर ठरला होतो. हा वर्ल्डकप ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. त्यानंतर 2011 साली भारताचा सलामीवर विरेंद्र सेहवाग हा त्या स्पर्धेत शतक झळकावणारा खेळाडू ठरला होता. महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली हा वर्ल्डकप भारताने जिंकला होता.
नक्की वाचा >> 'रचिन रविंद्र CSK मध्ये हवा'; World Cup च्या पहिल्या सामन्यानंतर धोनीचा फ्लेमिंगला मेसेज
2015 च्या वर्ल्डकपमध्ये हाच योगायोग ऑस्ट्रेलियाबरोबर पुन्हा घडला. या स्पर्धेतील पहिला शतकवीर हा अॅरॉन फिंच होता आणि ऑस्ट्रेलियानेच हा वर्ल्डकप जिंकला. 2019 साली जो रुटने स्पर्धेतील पहिलं शतक झळावलं. हा वर्ल्डकप इंग्लंडने जिंकला होता. हाच तर्क लावून आता 2023 च्या वर्ल्डकपमध्ये पहिलं शतक न्यूझीलंडच्या डेव्हिड कॉन्वेने झळकावलं आहे. त्यामुळे आता न्यूझीलंडच 2023 चा वर्ल्डकप जिंकणार का असा सवाल क्रिकेट चाहते विचारत आहेत.
In the last four World Cups, team of the first centurion went on to win the World Cup:
2007 - Ricky Ponting scored the first 100, Aus won the World Cup
2011 - Virender Sehwag scored the first 100, India won the World Cup
2015 - Aaron Finch scored the first 100, Australia won…
— Bharath Seervi (@SeerviBharath) October 5, 2023
न्यूझीलंडने मोठा विजय मिळवल्याने नेट रनरेटनुसार ते गुणतालिकेमध्ये पहिल्या स्थानी पोहोचले आहेत तर इंग्लंडचा संघ तळाशी आहे.